News Flash

सरकार-गणेश मंडळांमध्ये वादाची चिन्हे

प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदीचा अद्याप न सुटलेला तिढा आणि करोनाचे संकट यामुळे गणेशमूर्तीची उंची आणि भाविकांची गर्दी यावरील र्निबध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात कायम राहणार की

आता गणेशोत्सवात चारपैकी केवळ तीन दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आल्याने गणेशोत्सव मंडळांमध्ये आतापासूनच गोंधळ उडाला आहे.

गणेशोत्सवातील ध्वनिक्षेपकाच्या सवलतीतून एक दिवस वगळला

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदीचा अद्याप न सुटलेला तिढा आणि करोनाचे संकट यामुळे गणेशमूर्तीची उंची आणि भाविकांची गर्दी यावरील र्निबध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात कायम राहणार की विघ्न टळणार याबाबत संभ्रम आहेच. पण आता गणेशोत्सवात चारपैकी केवळ तीन दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आल्याने गणेशोत्सव मंडळांमध्ये आतापासूनच गोंधळ उडाला आहे. यावरून सरकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. मात्र हे नवे संकट निवारण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने राज्य सरकारला साकडे घातले आहे.

दरवर्षी मुंबईत ११ दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. गेल्या वर्षी करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवावर अनेक र्निबध घालण्यात आले होते. आगमनापासून विसर्जनापर्यंत भाविकांची गर्दी होऊन करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली होती. त्याचबरोबर गणेशमूर्तीच्या उंचीवरही बंधन घालण्यात आले होते.

मुंबईमध्ये रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास मनाई आहे. मात्र सभागृह आणि अन्य बंदिस्त जागांखेरीज अन्य ठिकाणी वर्षांतील १५ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक-ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वर्षांतील या १५ दिवसांची निवड करण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार २०१६ पासून हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

एकूण १५ दिवसांपैकी १३ दिवस विविध जाती-धर्माचे सण, राष्ट्रपुरुषांची जयंती आदींसाठी राखीव आहेत. त्यामध्ये गणेशोत्सवातील चार दिवसांचा समावेश आहे. यंदा गणेशोत्सव १० दिवस साजरा होत असून गौरी विसर्जन पाचव्या दिवशी होत आहे. यंदा गणेशोत्सवात चारऐवजी तीन दिवस (दुसरा, पाचवा व गौरी विसर्जन) सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत ध्वनिक्षेपक-ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी हे आदेश जारी केले आहेत. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.

गणेशोत्सवात मंडळांकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हे कार्यक्रम रात्री १२ पर्यंत सुरू असतात. या कार्यक्रमांमुळे नवे कलावंत घडतात. लहान मुलांमधील सुप्त गुणांना या कार्यक्रमांच्या माध्यमातून वाव मिळतो. त्यामुळे गणेशोत्सवात पाच दिवस उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक-ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अ‍ॅड. दहिबावकर यांनी राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात केली आहे.

आदेशांचा पुनर्विचार व्हावा – अ‍ॅड दहिबावकर

मुंबईत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी नियमात बदल करून ११ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत ध्वनिक्षेपक-ध्वनिवर्धकाच्या वापराची मुभा द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे. या मागणीचा अद्याप विचार झालेला नाही. त्यामुळे गणेशोत्सवात चारऐवजी पाच दिवस ही मुभा द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. या मागणीचा विचार करण्याऐवजी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात चारऐवजी तीन दिवसच परवानगी देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशांचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 1:38 am

Web Title: government and ganesh mandal dispute dd 70
Next Stories
1 लसीकरण मोहिमेचे विकेंद्रीकरण आवश्यक
2 विकासकांना सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव घाईघाईत मंजूर
3 भूस्खलनानंतर वेळेत पाणीपुरवठा सुरळीत करणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार
Just Now!
X