भीमा कोरेगावाच्या हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना सोडून सरकार शांततेच्या मार्गाने होणारी विद्यार्थ्यांची सभा उधळून लावत आहे. विद्यार्थ्यांना उचलून तुरूंगात टाकत आहे. विद्यार्थ्यांना तुरूंगात टाकणारे हे सरकार नाकर्ते आहे, अशी टीका आमदार कपिल पाटील यांनी केली. मुंबईच्या पार्ले परिसरातील भाईदास सभागृहात गुरूवारी आयोजित करण्यात आलेल्या छात्र भारतीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाईदास सभागृहातील छात्र भारतीच्या संमेलनात या संमेलनात गुजरातमधील दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी Jignesh Mevani आणि ‘जेएनयू’मधील आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेला विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद Umar Khalid यांची भाषणे होणार होती. मात्र, भीमा कोरेगाव हिंसाचार आणि महाराष्ट्र बंदमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ऐनवेळी कार्यक्रमाला परवानगी नाकारली. छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध केल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थी नेत्यांना अटक केली व उर्वरित विद्यार्थ्यांना परिसरातून हुसकावून लावले.

मुंबईत जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदच्या भाषणाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली; छात्र भारती आक्रमक

या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार कपिल पाटील यांनी संताप व्यक्त केला. सरकार संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करायची सोडून विद्यार्थ्यांना अटक करत आहे. सरकार भिडे आणि एकबोटेंची तारीफ करते. मात्र, शांततेच्या मार्गाने होणाऱ्या सभा उधळून लावते. आज सकाळपासून पोलिसांकडून विद्यार्थ्यांना अटक केली जात आहे. सभेच्या स्टेजवरील सामानही पोलिसांनी उचलून नेले. विद्यार्थ्यांच्या सभा उधळणारे, त्यांना अटक करणारे सरकार हे नाकर्ते असते. सरकारने एक कार्यक्रम रोखला म्हणून दुसरा कार्यक्रम होणारच नाही, असे नव्हे. सरकारने खूप प्रयत्न केले तरी ते आमचे असे किती कार्यक्रम बंद पाडणार, असे कपिल पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, गेल्या काही तासांमधील घडामोडी पाहता छात्र भारतीचे संमेलन जवळपास रद्द झाल्यातच जमा आहे. पोलिसांनी काही वेळापूर्वीच आमदार कपिल पाटील यांनाही ताब्यात घेतले. त्यामुळे आता जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद याठिकाणी आलेच तर पोलीस त्यांच्याविरोधात काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.