तहसीलदार कार्यालयात कारकून, व्यवसाय करण्यासाठी सरकारी नोकरी सोडली, व्यवसायात जमले नाही म्हणून बांधकाम मजूर म्हणून काम, राजकारणात प्रवेश आणि थेट विधानसभा उपाध्यक्षपद.. असा प्रवास नवे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष पुढील निवडणुकीत पराभूत होतो यामुळेच झिरवाळ यांना हे पद नको होते, पण आम्ही त्यांची भीती दूर केल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झिरवाळ यांचा निवडीचा किस्सा सांगितला.

सरकारमधील सत्तावाटपाच्या सूत्रानुसार विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्यावर पक्ष नेतृत्वाने दिंडोरीचे आमदार व आदिवासी समाजातील नेते नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी दिली. भाजपने माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उइके यांचा अर्ज मागे घेतल्याने झिरवाळ यांची बिनविरोध निवड झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी झिरवाळ यांना आसनस्थ केले.

यानिमित्ताने  भाषणांतून झिरवाळ यांचा प्रवास उलगडला. झिरवाळ यांच्या रूपाने वंचित समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला हा मान मिळाला. त्यांना कीर्तनाची आवड आहे. पण वरून कीर्तन आतून तमाशा असा प्रकार नाही, मला ते जमत नाही, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काढला.

झिरवाळ हे तहसीलदार कार्यालयात कारकून होते. ती नोकरी सोडून ते व्यवसायात पडले. पण तेथे त्यांना यश मिळाले नाही. परिस्थितीमुळेच  त्यांना बांधकाम मजूर म्हणून काम करावे लागले. त्यातून ते आता या विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचल्याचा प्रवास अजित पवार यांनी उलगडून सांगितला तेव्हा सभागृहाने बाके वाजवून कौतुक केले. विधानसभेचा उपाध्यक्ष झाल्यावर पुढच्या निवडणुकीत पराभव होतो अशी भीती झिरवाळ यांच्या मनात वसंत पुरके, विजय औटी यांच्यासह चौघांच्या अनुभवामुळे होती. पण मी त्यांना मधुकर चव्हाण हे उपाध्यक्ष झाल्यानंतर पुढच्या वेळी मंत्री झाल्याचे त्यांना सांगितले, असा किस्सा अजित पवारांनी ऐकवल्यावर सभागृहात हशा उसळला.

विरोधक डाव्या बाजूला बसत असल्याने डाव्या बाजूकडे जरा जास्त लक्ष ठेवा अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्याचा संदर्भ घेत, सतत मोबाइलवर बोलत असल्याने काही काळापासून मला डाव्या कानाने कमी ऐकू येते, असे झिरवाळ यांनी आभाराच्या भाषणात जाहीर करताच हशा उसळला.