केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अतिक्रमण मुक्त करण्यासाठी विविध संस्था व राजकीय पक्षांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. हे प्रस्ताव आले असून या सगळ्यांची मते पाहून अतिक्रमणे हटवण्याचा अंतिम प्रस्ताव महिनाभरात तयार करण्यात येईल. ही अतिक्रमणे हटवल्यानंतर उद्यानाच्या सीमा स्पष्ट होणार असून ही सीमा सुद्धा महिनाभरात सुनिश्चित करण्यात येईल. यानंतर उद्यानाचे क्षेत्रही वाढलेले दिसेल, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कार्यक्रमादरम्यान सांगितले. उद्यानात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. या वेळी वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘गो वाईल्ड फॉर लाईफ’ या संकल्पनेवर आधारित उपक्रम यंदा राबवण्यात आले असून वन्य प्राण्यांचे अवयव, शिंगे, कातडी, हस्तीदंत आदींची तस्करी थांबवण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. गेंडय़ांचे एक शिंग परदेशात १ कोटी रुपयांना विकले जात असून भारतात असे किमान ३ हजार गेंडे आहेत. ही गंभीर बाब असून तस्करी रोखण्यासाठी कायद्यात आम्ही सुधारणा केली आहे. अशा २४ तस्करांना मारल्याचे जावडेकरांनी सांगितले. येत्या १ जुलैला संपूर्ण राज्यात एकत्रच २ कोटी झाडे लावण्यात येणार आहेत, असे वनखात्याचे सचिव विकास खारगे यांनी सांगितले.

अमेरिकेसोबत करार
पशूपक्ष्यांच्या डीएनए व न्यायवैद्यकीय नमुन्यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जतन व संशोधन करण्यासाठी अमेरिकेसोबत करार करण्यात आला आहे.

न्यायालयाच्या निर्णयाला बगल?
उद्यानात येणारे पर्यटक लांबून येत असल्याने त्यांच्यासाठी उद्यानात भेळपुरी, आईसक्रीम असे खाद्यपदार्थ मिळणे आवश्यक असून याबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली. मात्र, अस्वच्छतेच्या मुद्दय़ावरून १९९५ साली उच्च न्यायालयाने उद्यानात असणारे खाद्य पदार्थाचे ठेले हटवले होते. याचा शेट्टींना विसर पडल्याची चर्चा उपस्थित पर्यावरण तज्ज्ञांमध्ये या वेळी सुरू होती.