मुंबईत प्रवेश करताना आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल बंद करण्याबाबत उपायोजना सुचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आनंद कुलकर्णी समितीच्या अहवालावरून मंत्री आणि त्यांच्या विभागातच गोंधळ सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या अहवालाचा अभ्यास सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील सांगत असताना त्यांच्याच विभागाने मात्र हा अहवाल शासनास सादरच झालेला नसल्याचा दावा केला आहे. विद्यमान अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल शासनास सादर करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचा दावाही विभागाने केला आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलमुक्ती तूर्तास लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई एण्ट्री पॉइंट आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग या दोन्ही प्रकल्पांची वित्तीय तसेच कायदेशीर व्यवहार्यता तपासण्यासाठी राज्य सरकारने जून २०१५ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या समितीने मुंबई एण्ट्री पॉइंट प्रकल्पाबाबत मे. समर्थ सॉप्टटेक कंपनीकडून, तर मुंबई-पुणे महामार्गावरील वाहनांची गणना ध्रुव कन्सल्टन्सी यांच्याकडून करून घेतली. मात्र या समितीचे प्रमुख आनंद कुलकर्णी अहवाल देण्यापूर्वीच ३१ जानेवारी रोजी शासकीय सेवेतून निवृत्त झाले. हा अहवालच आलेला नसल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. या टोलचा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या श्रीनिवास घाणेकर यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आनंद कुलकर्णी समितीच्या अहवालाबाबत विचारणा केली. त्यावर कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा अहवाल शासनास सादरच होऊ शकलेला नाही. त्यामुळे या विभागाचे सध्याचे अप्पर मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखाली पथकरविषयक समितीचा अहवाल शासनास सादर करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे विभागाच्या अवर सचिवांनी १० फेब्रुवारीच्या पत्रान्वये घाणेकर यांना कळविले आहे. सरकार टोलबाबत मुंबई-ठाणेकरांची दिशाभूल करीत असून ठेकेदाराला मदत करण्याचीच सरकारची भूमिका असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप घाणेकर यांनी केला आहे.
अहवालाचा अभ्यास
समितीचा अहवाल शासनास मिळाला असून विद्यमान अप्पर मुख्य सचिव त्याचा अभ्यास करीत आहेत. तो अहवाल विभागाच्या आम्हा दोन्ही मंत्र्यांकडे आल्यानंतर पुढील निर्णय होईल, अस मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.