News Flash

गणेशोत्सव मंडळे संभ्रमात!

ध्वनिक्षेपक मध्यरात्रीपर्यंत वापराच्या दिवसांबाबत सरकारकडून सूचना नाही

मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी जल्लोषात गणरायाचे स्वागत केले.

ध्वनिक्षेपक मध्यरात्रीपर्यंत वापराच्या दिवसांबाबत सरकारकडून सूचना नाही

गणेशोत्सवाला सुरुवात झाली तरी अकरापैकी कोणत्या चार दिवशी रात्री १० ऐवजी मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करावा, याबाबत राज्य सरकारकडून अद्यापही पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे संभ्रमात आहेत. राज्य सरकारकडून कोणत्याच सूचना मिळाल्या नाहीत, तर रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास प्रतिबंध करण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याचे समजते.

ध्वनिप्रदूषण वाढत असल्यामुळे काही वर्षांपासून रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईमध्ये ३६५ दिवसांपैकी १५ दिवस रात्री १० ऐवजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा मर्यादित आवाजामध्ये वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

गणेशोत्सवामध्ये त्यापैकी चार दिवस मध्यरात्री १२ पर्यंत मर्यादित आवाजात जागर करण्याची परवानगी आहे. त्यामध्ये दीड दिवस, पाचवा दिवस, गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशी या चार दिवसांचा समावेश आहे. गणेशोत्सवातील या चार दिवसांची निवड गेल्या वर्षीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जात होती. त्याबाबतची सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पोलीस आयुक्तांना करण्यात येत होती आणि पोलीस आयुक्त कार्यालयाकडून स्थानिक पोलीस ठाण्यांना सूचित करण्यात येत होते. मात्र, या दिवसांची निवड करण्याचा अधिकार राज्य सरकारचा असून तो दुसऱ्या यंत्रणांना देता येत नाही. त्यामुळे शासनानेच या चार दिवसांची निवड करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.गणेशोत्सवापूर्वी सरकारकडून या चार दिवसांची निवड करून त्याबाबतचे आदेश पोलीस ठाण्यांना देणे अपेक्षित होते.

न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने गणेशोत्सवातील चार दिवसांबाबत घोषणा करायला हवी होती. परंतु, अद्यापही घोषणा न केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनाही या संदर्भात पत्र पाठविले आहे. मात्र, गणेशोत्सवाला सुरुवात झाली तरी सरकारकडून कोणत्याच सूचना देण्यात आलेल्या नाहीत. परिणामी,  परिस्थितीला सरकारच जबाबदार राहील.

 -अ‍ॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

 

राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मोदकाचा प्रसाद

गणेश चतुर्थीनिमित्त सोमवारी राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना मोदकांचा प्रसाद देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. मुंबई येथून दिल्लीला रवाना होणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमधील सुमारे ८०० प्रवाशांना या  प्रसादाचा लाभ मिळणार आहे.

 

विविध उपाययोजनांमुळे कोकण मार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न टळले

  • कोलाड ते इंदापूर दरम्यानचा अपवाद वगळता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास निर्वघ्निपणे पार पडला.
  • रायगड जिल्हा प्रशासन व पोलिसांनी ठोस व आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याने गणेशभक्तांचा प्रवास सुखकर झाला.
  • खड्डे बुजविण्याबरोबरच वाहतूक कोंडीचे प्रमुख ठिकाण असलेल्या पेण ते रामवाडीदरम्यान दुभाजक टाकण्यात आले असून रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तनात करण्यात आले होते.
  • महामार्गावर तब्बल १६ ठिकाणी ५० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्याद्वारे वाहतुकीचे नियमन करण्यात येत होते. अपघातग्रस्त किंवा नादुरुस्त वाहने तातडीने बाजूला करण्यासाठी क्रेन्स तनात ठेवण्यात आले होते.
  • या वर्षी प्रथमच पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीमचा वापर करण्यात आला होता. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ध्वनीक्षेपकावरून वाहतुकीसंदर्भात माहिती दिली जात होती. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पर्यायी मार्ग सुचविण्यात आले होते. या मार्गाचा त्यांनी वापर केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 1:53 am

Web Title: government doesnt notice about ganesh chaturthi noise pollution
Next Stories
1 मंडपांच्या खड्डयांची मोजणी सुरू; प्रत्येकी दोन हजार दंड
2 फुलांचे दर चढेच; झेंडू ११० रुपये किलो
3 ‘भेंडीबाजारात कारवाई करण्याची हिंमत आहे?’
Just Now!
X