सरकारी कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाचे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने स्वागत केले आहे. मात्र त्यासाठी दररोज एक तास कामाची वेळ वाढविण्यास विरोध केला आहे. मुळात पाच दिवसांच्या आठवडय़ासाठीच १ ऑगस्ट १९८७ पासून दररोज ७० मिनिटांची जादा कामाची वेळ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी कामाचे तास वाढवून कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नये, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
यापूर्वी अल्प कालावधीसाठी सुरू करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या आठवडय़ांच्या कामाची वेळ वाढविण्यात आली होती, असे महासंघाने शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. पूर्वी सरकारी कार्यालयांची वेळ सकाळी १०.३० वा. ते सायंकाळी ५ वा. अशी होती. १९८६-८७ या कालावधीत पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला, त्या वेळी कामाची वेळ सकाळी ९.५० वा. ते सायंकाळी ५.३० वा. अशी करण्यात आली. म्हणजे ७० मिनिटांनी कामाची वेळ वाढविण्यात आली. सव्वा वर्षांनंतर पाच दिवसांचा आठवडा बंद करण्यात आला, कामाची वेळ तीच ठेवण्यात आली. तेच वेळापत्रक कायम ठेवून पाच दिवसांचा आठवडा करावा असे आवाहन महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे यांनी केले आहे.