एलबीटीविरोधी आंदोलन ढेपाळले!

राज्य सरकारची ठाम भूमिका आणि व्यापारी संघटनांमध्ये पडलेली उभी फूट यांमुळे व्यापाऱ्यांचे एलबीटीविरोधी आंदोलन ढेपाळत चालले असून, राज्यव्यापी आंदोलनातील हवा निघून गेली आहे. एस्मा लावूनच दाखवा अशी आव्हानात्मक भाषा वापरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या नेत्यांनीही आता नरमाईचे धोरण अवलंबिले असून चर्चेचा उपचार पार पाडल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली जाईल असे संकेत मिळू लागले आहेत.

आंदोलन मागे घेतल्याशिवाय चर्चा नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरुवातीपासूनच घेतली होती, तरीही सरकारी पातळीवरूनही तोडग्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आंदोलनाची कोंडी कायम होती. तीन आठवडय़ांहून अधिक काळ ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले असतानाच, दीर्घकाळ दुकाने बंद ठेवावी लागल्याने किरकोळ व्यापारीही कोंडीत सापडले होते. त्यामुळे, हळुहळू आंदोलनातून बाहेर पडणाऱ्यांचा ओघ वाढू लागला. आंदोलनाची तीव्रता कमी होऊ लागल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापारी संघटनाही मवाळ झाल्या आहेत. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर मुख्यमंत्र्यांनी व्यापारी नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. मुख्यमंत्र्यांनी चर्चेला वेळ देण्याचे मान्य केल्याने व्यापारी संघटनांची सोमवारी बैठक होत असून त्यात आंदोलन मागे घेण्याबाबत विचार करण्यात येईल.

 

जकात नाहीच- मुख्यमंत्री

व्हॅटबरोबर एलबीटीचा आकारणी किंवा जकात कर सुरू ठेवण्याच्या पर्यायांवर विचार होणार नाही. फक्त स्थानिक संस्था कराबाबत व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. एलबीटीसाठी मर्यादा वाढविणे आणि कागदपत्रे तपासणीपूर्वी नगरविकास विभागाच्या सचिवांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्याची तयारी राज्य शासनाने दर्शविली आहे.

 बैठकीत निर्णय- गुरनानी

शरद पवार यांच्याबरोबर भिवंडीमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे व्यापारी संघटनेचे नेते मोहन गुरनानी यांनी सांगितले. मुंबईत सोमवारी व्यापारी संघटनांच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यात पुढील दिशा ठरविण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार लेखी निवेदन त्यांना उद्याच सादर करण्यात येईल, अशी माहिती गुरनानी यांनी दिली.

 पवारांच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांचा बंद मागे

कृषिमंत्री शरद पवार यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर ठाण्यातील व्यापाऱ्यांनी रविवारी सायंकाळी बेमुदत बंद आंदोलन मागे घेतले. ठाणे महापालिकेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने पवार ठाण्यात आले होते. येत्या २४ मे रोजी एलबीटीसंबंधी आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहोत. तोपर्यंत व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन पवार यांनी व्यापाऱ्यांना केले. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सायंकाळी सर्व दुकाने सुरू करण्यात आली.