हमीपत्रावर डाळींचे साठे मुक्त होऊनही दर चढेच

हमीपत्रावर सुमारे ५७ हजार मेट्रिक टन डाळींचे साठे मुक्त होऊनही खुल्या बाजारातील दरांवर मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला नसून दर चढेच आहेत. हमीपत्रावर बंधमुक्त केलेल्या साठय़ातील तूरडाळ १०० रुपये प्रति किलोने व्यापाऱ्यांनी ग्राहकांना विकावी, यासाठी विशेष पथके स्थापन करून तपासणी करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी दिल्या असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. मात्र केवळ ९ दिवस छापे मारल्यानंतर र्निबध असूनही सरकारने व्यापाऱ्यांवर पुन्हा छापे मारण्याचे आदेश दिलेले नसल्याने साठेबाजी सुरूच आहे.
तूरडाळ व अन्य डाळींचे दर वाढल्याची ओरड झाल्यावर साठय़ांवर र्निबध लागू करण्यात आले व अन्न व नागरी पुरवठा विभागाने छापे टाकून सुमारे ८७ हजार मेट्रिक टन तूर व अन्य डाळींचे साठे सीलबंद केले. हमीपत्रावर त्यापैकी ५७ हजार मेट्रिक टन साठे मुक्त करण्यात आले असून त्यापैकी तुरीचा साठा १० हजार ५९० मेट्रिक टन इतका आहे. पण ही अख्खी तूर असून ती भरडण्यासाठी गिरणीमध्ये पाठवून बाजारात येण्यास अजून काही दिवस लागतील. सरकारने केवळ तूरडाळीसाठी १०० रुपये प्रति किलोने विकण्याची सक्ती केली असून अन्य डाळींचा दर ठरवूनच दिलेला नाही. किराणा दुकानांमधून ग्राहकांना १०० रुपये प्रति किलोने तूरडाळ विकली जाते की नाही, यावर लक्ष ठेवणे सरकारला खूपच कठीण आहे.