शास्त्रीय संगीताचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तसेच नव्या पिढीमध्ये शास्त्रीय संगीताबाबत आवड निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ गायक दिवंगत पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने शास्त्रीय संगीत प्रोत्साहन योजना राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत पाच वेगवेगळे उपक्रम सुरू केले जाणार आहेत. युवा शिष्यवृत्ती, शास्त्रीय संगीत महोत्सव, गुरुकुल योजना, जीवनगौरव पुरस्कार, शास्त्रीय संगीतासाठी काम करणाऱ्या नोंदणीकृत संस्थांना आर्थिक अनुदान आदी योजनांचा यात समावेश आहे. युवा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शास्त्रीय गायनाचे आणि वादनाचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकी सहा अशा एकूण १२ विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये नुसार दोन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने दरवर्षी २४ जानेवारी रोजी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून दरवर्षी राज्याच्या एका महसुली विभागात दोन दिवसांचा हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवासाठी शास्त्रीय गायन क्षेत्रातील दोन आणि शास्त्रीय वादन क्षेत्रातील दोन अशा चार कलाकारांना निमंत्रित केले जाणार आहे.गुरुकुल योजनेत गुरुच्या घरी राहून शिष्याने शास्त्रीय संगीताचे ज्ञान मिळवावे, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी नवीन जागा आणि अन्य पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. शास्त्रीय गायन आणि वादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठ कलाकाराला पाच लाख रुपयांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या शास्त्रीय संगीत महोत्सवात प्रदान करण्यात येणार असून पुरस्कारप्राप्त व्यक्तिची निवड करण्यासाठी एका निवड समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
शास्त्रीय संगीतातील नोंदणीकृत संस्थांना अनुदान दिले जाणार असून प्रत्येक महसुली विभागातील एक या प्रमाणे सहा संस्थांना प्रत्येकी २ लाख रुपये दिले जाणार आहेत. हे अनुदान मिळविण्यासाठी त्या संस्थेने शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात किमान दहा वर्षे काम केलेले असले पाहिजे. या पाच उपक्रमांसाठी ४५ लाख ६६ हजार रुपये खर्च येणार असून त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.