वेळ घेऊनच प्रवेश देण्याचे बंधन

मुंबई : राज्य सरकारने सलून आणि पार्लर सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर तीन दिवसांनी मुंबई महापालिके ने शहरासाठीची नियमावली जाहीर करत प्रत्येक ग्राहकाला यापुढे वेळ घेऊनच प्रवेश देण्याचे बंधन घातले आहे. तसेच संपूर्णत: बंदिस्त आणि वातानुकूलित अशी व्यवस्था पार्लर आणि सलूनमध्ये असू नये असेही यात म्हटले आहे.

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच सुधारीत नियमावली जाहीर केली आहे. त्यात पार्लर, सलूनधारकांनी कोणकोणती काळजी घ्यावी, कसे सामाजिक अंतर राखावे, ग्राहकांना कोणत्या सेवा द्याव्यात याविषयी सूचना केल्या आहेत. पार्लर, सलून सुरू होऊन तीन दिवस झाले आहेत. व्यावसायिकांनी राज्य सरकारचे नियम पाळून सेवा सुरू केल्या आहेत. त्यानंतर आता पालिकेने आपली नियमावली जाहीर केली आहे.

नियमावली अशी आहे..

’ केश कर्तनालये, ब्यूटी पार्लर इत्यादी ठिकाणी पूर्व निर्धारित वेळ घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देता येईल.

’ या प्रकारच्या सर्व आस्थापनांमध्ये हवा खेळती राहील अशा प्रकारची व्यवस्था असणे बंधनकारक आहे. फक्त वातानुकूलन यंत्रणा असलेले बंदीस्त ठिकाण नसावे.

’ केवळ केस कापणे, केसांना रंग लावणे, वॅक्सींग, थ्रेडींग इत्यादी बाबींनाच परवानगी असेल. तसेच त्वचेशी संबंधित कोणत्याही सेवेस परवानगी देण्यात आलेली नाही. याबद्दलची माहिती आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे लावणे बंधनकारक आहे.

’ कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अ‍ॅप्रन,  मुखपट्टी वापरणे बंधनकारक आहे.

’ प्रत्येक व्यक्तीला सेवा दिल्यानंतर खुर्ची / ठिकाण हे प्रत्येक सेवेनंतर निर्जंतुक करावे. तसेच दुकानातील फरशी / जमीन या बाबी दर दोन तासांनी निर्जंतुक करणेही बंधनकारक आहे.

’ प्रत्येक ग्राहकासाठी एकदा वापरून टाकून देता येईल असे स्वतंत्र रुमाल वापरणे आवश्यक आहे.