औषध पुरवठादारांचा असहकार

मुंबई : सरकारी रुग्णालयांना औषध आणि वैद्यकीय साहित्य पुरवणाऱ्या पुरवठादारांचे ६० कोटींचे देयक थकवल्याने ‘ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन’अंतर्गत येणाऱ्या सर्व पुरवठादारांनी सरकारी रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबईतील जे. जे., सेंट जॉर्ज, कामा आणि जी. टी. आदी रुग्णालयांचा समावेश आहे.

रुग्णांसाठी आवश्यक असणारी औषधे खासगी पुरवठादारांकडून घेतली जातात आणि सरकारी नियमावलीनुसार त्यांचे देयकही रुग्णालयाकडून संमत केले जाते. परंतु महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील जे. जे., सेंट जॉर्ज, कामा आणि जी. टी या चार रुग्णालयांनी २०१५ पासून पुरवठादारांचे देयक थकवल्याचा आरोप ऑल फूड अँड ड्रॅग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनने केला आहे. चार रुग्णालयांची मिळून अंदाजे ६० कोटी इतकी रक्कम थकीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या संदर्भात फाऊंडेशनच्या सदस्यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सचिव संजय मुखर्जी यांच्याशी संवाद साधला असता, हा व्यवहार बोगस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय असा परस्परव्यवहार करण्याची रुग्णालयांना परवानगी नाही, असेही ते म्हणाले.

पोलीस आयुक्तांना पत्र..

वाद चिघळल्याने ऑल फूड अँड ड्रॅग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाचा छडा लावण्याची विनंती केली आहे. या फाऊंडेशनअंतर्गत ३० हून अधिक पुरवठाधारक सरकारी रुग्णालयांशी संलग्न आहेत. त्यापैकी १७ पुरवठाधारकांच्या स्वाक्षरीचे पत्र आयुक्तांना देण्यात आले आहे. शिवाय देयक रक्कम देण्याबाबत सरकार हमी देत नाही तोवर या रुग्णालयांना केला जाणारा औषधपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आला असल्याचे फाऊंडेशनचे सदस्य अभय पांडे यांनी सांगितले.

पाच महिन्यांपूर्वी मी जे. जे. रुग्णालयात अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारला तेव्हापासून ते आतापर्यंत औषधांची सर्व देयक रक्कम पुरवठादारांना शासकीय नियमानुसार मिळाली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या बाजूने सर्व व्यवहार पारदर्शी आहे. पुरवठादारांची थकबाकी २०१३ पासून असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून तत्परतेने यावर तोडगा काढण्याचा माझा प्रयत्न असेल.

– डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय