करोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार असली तरी राज्यात प्रवासी सेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला आहे.

राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद ही विमानतळांची शहरे लाल क्षेत्रात येत असल्याने विद्यार्थी, वैद्यकीय किंवा अत्यावश्यक सेवेसाठीच वापर व्हावा आणि किमान विमानसेवा सुरू करावी,  अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावरून दररोज २७ हजार ५०० प्रवासी ये-जा करतील, अशी आकडेवारी ‘मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड‘ (एम.ए.आय.एल.) या कंपनीने महाराष्ट्र सरकारला सादर केली होती. राज्य शासनाने मुंबई विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू करण्याबाबतचा आक्षेप मुंबई विमानतळ कं पनीला कळवला आहे. त्यात राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद ही विमानतळे असलेली शहरे ही लाल क्षेत्रात मोडतात याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. या सर्व शहरांमध्ये वाहतूक आणि इतर सारे निर्बंध कायम आहेत. अशा वेळी विमान प्रवाशांसाठी अपवाद करणे शक्य होणार नाही, असेही राज्य शासनाने कळविले आहे.

भीती काय?

राज्यात येणारे प्रवासी देशाच्या अन्य प्रतिबंधित क्षेत्रांमधून आल्यास विमानतळावर अडकून पडण्याची भीती आहे. तसेच प्रवासी कुठून येणार याची विमान कंपन्यांनाही काहीही माहिती नाही. महाराष्ट्रातील एकूणच परिस्थिती लक्षात घेता २५ मेपासून प्रवासी सेवा सुरू करणे योग्य होणार नाही. अडकलेले विद्यार्थी वा परदेशी नागरिक, वैद्यकीय सेवा किंवा अत्यावश्यक असेल अशांसाठीच किमान विमानसेवा सुरू करावी, अशी भूमिका राज्य शासनाने मांडली आहे.

सरकार म्हणते..

* मुंबईत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक प्रशासनावर ताण वाढत आहे. रुग्णांची संख्या अधिक असल्यानेच मुंबईत रिक्षा-टॅक्सीसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

* अशा परिस्थितीत  प्रवासी सेवा सुरू केल्यास मुंबईत येणाऱ्या किंवा येथून जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होतील.

* अत्यंत कमी कालावधीत प्रवाशांच्या वाहतुकीचे नियोजन करणे शक्य नाही. तसेच टाळेबंदीच्या आदेशाचेही उल्लंघन होईल. करोनाशी लढणाऱ्या स्थानिक प्रशासनावर ताण येईल.