News Flash

आत्महत्या टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या मानसिकतेची जपणूक!

कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी त्याच्या कारणांच्या मुळाशी जात मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने शेतकऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य मजबूत करण्याचा अभिनव उपक्रम आरोग्य विभागाने हाती घेतला आहे.
प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडय़ात गेली अनेक वर्षे शेतकरी आत्महत्या करत असून शासनातर्फे याच्या करणांचा शोध घेऊन उपाययोजना करण्यासाठी काही समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या. तथापि शेतकऱ्यांचे मानसिक स्वस्थ्य ठिक रहावे व आत्महत्या करण्यास प्रवृत्त होण्याऐवजी परिस्थिशी मुकाबला करण्यासाठी त्यांच्या मनोधैर्यात वाढ व्हावी यासाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने एक कृती आराखडा तयार केला. ‘आशा’ या आरोग्य सेविकांची यातील भूमिका अत्यंत महत्त्वाची असून उस्मानाबाद जिल्ह्य़ात ‘आशा’ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत मानसोपचार तज्ज्ञ व आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या माध्यमातून एक प्रश्नावली बनविण्यात आली आहे. ही प्रश्नावली घेऊन आरोग्य सेविका जिल्ह्य़ातील शतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करतात तसेच आवश्यक ती माहिती गोळा करतात. या माहितीचे वर्गीकरण करून ज्या शेतकऱ्यांना मानसिक उपचाराची आवश्यकात असेल अशांना उपजिल्हा रुग्णालय अथवा संदर्भित केंद्रांमध्ये नेण्यात येते.
तेथील प्रशिक्षित डॉक्टर या शेतकऱ्यावर उपचार करतात. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्य़ात यासंदर्भात पायलट प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली असून लवकरच आणखी बारा जिल्ह्य़ांमध्ये हा प्रकल्प राबविला जाईल, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. एकटय़ा यवतमाळचा विचार केल्यास २००१ पासून आजपर्यंत साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करण्याच्या मानसिकतेचा तसेच अन्य विविध कारणांचा विचार करून ‘आशा’चा माध्यमातून शेतकऱ्यांचे व त्यांच्या परिस्थितीचे सर्वेक्षण केले जाते. यातून जेथे मदतीची गरज आहे तेथे डॉक्टर व आशाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने शेतकऱ्याचे मनोधैर्य वाढविण्याठी उपचार केले जातात.यामध्ये अ‍ॅन्टी डिप्रेशन औषधे देण्यापासून समुपदेशनापर्यंत सर्व उपचार केले जातात असेही डॉ. सावंत म्हणाले. आगामी काळात अमरावती, बीड, बुलढाणा, हंगोली, वर्धा तसेच अकोला औरंगाबाद, नांदेड, लातूर आणि यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये मानसोपचार तज्ज्ञ व उपचाराच्या सुविघा वाढवण्यात येणार आहेत. यासाठी २३ कोटींची योजनाही आखण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 3:37 am

Web Title: government launches initiative to make farmer mental condition strong to prevent suicides
Next Stories
1 ‘त्या’ अवशेषाचे ‘डीएनए’ इंद्राणीशी जुळले
2 मंडळाचा डोलारा दीड कोटींचा अन् निधी पाच कोटींचा?
3 शिवसेनेला शह देण्यासाठी गणेशोत्सव समन्वय महासंघ
Just Now!
X