ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात सरकारी वकील संध्या दिनकर बच्छाव यांना १० हजार रूपयांची लाच घेताना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
पोलिसांनी सांगितले, वाशी येथे राहणाऱ्या राधा पारेख यांनी दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीविरूद्ध वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याप्रकरणाची न्यायालयात सुनावणी होणार होती. राधा यांनी संध्या बच्छाव यांच्याकडे या तक्रारीबाबत विचारणा केली होती. या प्रकरणाची कागदपत्रे आपणाकडे आहेत. या प्रकरणात न्यायालयासमोर बाजू मांडण्यासाठी तुला प्रथम मला ५० हजार रूपये द्यावे लागतील, असे अ‍ॅड. बच्छाव यांनी राधा यांना सांगितले. या रकमेतील १० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना अ‍ॅड. बच्छाव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने न्यायालयाच्या आवारात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक दिलीप पाटील तपास करीत आहेत.