मुंबईमध्ये पदपथांवर पथाऱ्या पसरून पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांचा सुळसुळाट वाढतच असून त्यांना वेसण घालण्यात पालिका अपयशी ठरत आहे. रात्री उशिरापर्यंत पदपथावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या अनुज्ञापन खात्यातील निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची तिसरी पाळी सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मात्र पालिका प्रशासन त्यासाठी राजी नाही. त्यामुळे संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकणारे पदपथ मोकळे होण्याची शक्यता धूसर बनली आहे. मुंबई शहर मध्यरात्रीनंतरही जागते असते. रेल्वे स्थानके, काही रुग्णालयांचा परिसर, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी रात्री ११ वाजेपर्यंत फेरीवाल्यांचा गोंधळ सुरू असतो. इतकेच नव्हे तर मध्यरात्रीनंतरही अनेक भागांत फेरीवाल्यांचे साम्राज्य पसरलेले असते. काही ठिकाणच्या खाऊ गल्ल्या पहाटे ३-४ वाजेपर्यंत सुरू असतात. अनेक भागांतून तरुणांची टोळकी येथे आपली तृष्णा भागविण्यासाठी येत असतात. काही वेळा या खाऊ गल्ल्यांमध्ये मद्यधुंद तरुण हैदोस घालतात आणि त्याचा नाहक त्रास या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. या अनधिकृत फेरीवाल्यांवर ना पोलिसांचे नियंत्रण ना पालिकेचे.

पालिकेच्या अनुज्ञापन खात्याच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे दोन पाळ्यांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई केली जाते. सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ अशा दोन पाळ्यांमध्ये हे पथक फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारत असते. मुंबईमध्ये दुपारनंतर फेरीवाल्यांचा थैमान सुरू होतो. अनेक ठिकाणी पथाऱ्या पसरून पदपथ अडवले जातात. सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळी तर फेरीवाल्यांचा कलकलाट टिपेला पोहोचतो. थकलेल्या मुंबईकरांना त्यातूनच वाट काढत घरचा रस्ता धरावा लागतो. संध्याकाळी पालिकेचे हे पथक अभावानेच कारवाई करताना दिसते. रात्री ११ नंतर त्यांची कार्यालयीन वेळ संपते आणि मग खाऊ गल्ल्यांमधील फेरीवाल्यांचे आयतेच फावते.

मुंबईमधील फेरीवाल्यांविरुद्ध संध्याकाळीही पूर्ण क्षमतेने कारवाई व्हावी यासाठी अनुज्ञापन खात्यातील निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची तिसरी पाळी सुरू करावी अशी मागणी नगरसेवकांकडून विधी समितीत करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने ही मागणी धुडकावून लावली आहे. तिसऱ्या पाळीसाठी अतिरिक्त निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची भरती करावी लागेल. त्यामुळे आस्थापना खर्चात वाढ होईल, असे कारण पुढे करीत या कर्मचाऱ्यांची तिसरी पाळी सुरू करण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. त्यामुळे आता फेरीवाल्यांचे फावणार आहे.

फेरीवाल्यांना पायबंद

संध्याकाळची फेरीवाल्यांची संख्या लक्षात घेता कारवाई करण्यासाठी दुसऱ्या पाळीतील कर्मचाऱ्यांची दमछाक होते. पूर्ण क्षमतेने ते काम करू शकत नाहीत. त्यामुळे तिसरी पाळी सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे रात्रीबेरात्री व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनाही पायबंद घालता येईल. त्यामुळे प्रशासनाने अनुज्ञापन खात्यातील निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या पाळीचा फेरविचार करावा.

वर्षां टेंबवलकर, शिवसेना नगरसेविका