मुंबई आणि उपनगरांमध्ये मागील पडणाऱ्या जोरदार पावसामुळे राज्य सरकारने मंगळवारी (२ जुलै २०१९) रोजी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन ही हे ट्विट करण्यात आले आहे. शाळा कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईमध्ये आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे मुंबई महानगरपालिकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आज दिवसभर मुंबई आणि परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईत काल रात्री पासूनच जोरदार पाऊस पडत असल्याने लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवरील गाड्या ठाणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येत असून पश्चिम रेल्वेही उशीराने धावत आहे.  रस्त्यांवरही पाणी साचल्याने अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.