राज्य सरकारकडून जबाबदारीचे ओझे स्थानिक प्रशासनावर

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ३१ डिसेंबपर्यंत बंद..

पुण्यात मात्र परवानगी

राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने शुक्रवारी मागे घेतला आणि शाळा सुरू करण्याच्या जबाबदारीचे ओझे स्थानिक प्रशासनांवर टाकले. त्यानुसार मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील प्रशासनांनी ३१ डिसेंबपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत शाळा ३१ डिसेंबपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्या तरी पुणे, पिंपरीतील शाळा मात्र ठरल्यानुसार सोमवार, २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत.

नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला होता. त्यानुसार शाळांसाठी नवी करोना प्रतिबंधात्मक नियमावलीही जारी करण्यात आली होती. शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांची करोना चाचणी आदी जबाबदाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्ण कराव्यात, असे आदेशही शिक्षण विभागाने दिले होते. अनेक खासगी शाळांनी वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू केली होती. आता मात्र, हा निर्णय विभागाने स्थगित केला आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावा, अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे.

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ‘देशात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. अन्य राज्यांतील परिस्थिती पाहता आपल्याकडेही दुसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेऊन पुढील चार ते सहा आठवडे विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शाळा ३१ डिसेंबपर्यंत बंद ठेवण्यात याव्यात’, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केले आहे. वर्ग भरणार नसले तरीही दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा नियमित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत. ठाणे जिल्ह्य़ातही ३१ डिसेंबपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. परंतु, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिका, पुणे जिल्ह्य़ातील शाळा सुरू करण्याचा निर्णय तेथील प्रशासनांनी घेतला आहे.

शिक्षक संभ्रमात

मुंबई आणि ठाण्यातील शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय संभ्रम वाढवणारा असल्याची टीका शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांनी केली आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असतील तर शिक्षकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. शिक्षकांनाही घरून काम करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणीही संघटनांनी केली आहे. गेले चार दिवस विविध ठिकाणी शिक्षकांच्या करोना चाचण्या सुरू आहेत. आता जानेवारीत शाळा सुरू करताना शिक्षकांना पुन्हा चाचणी करावी लागणार का असाही प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

शाळा वेगवेगळ्या वेळी

शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे निर्णय सोपवल्यामुळे आता शाळा वेगवेगळ्या वेळी सुरू होतील. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षांना विद्यार्थ्यांना एकाचवेळी सामोरे जावे लागणार आहे. सध्या ऑनलाइन शाळा सुरू असल्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षांपूर्वी प्रत्यक्ष वर्गामध्ये काही काळ अध्यापन केले जावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. अशावेळी वेगवेगळ्या वेळी शाळा सुरू झाल्यानंतर स्पर्धात्मक स्वरूप असलेली परीक्षा मात्र एकाच वेळी होणार हे विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

आश्रमशाळा १ डिसेंबरपासून

आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळांमधील नववी ते बारावीचे वर्ग आणि वसतिगृहे १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. विभागाच्या नियमावलीचे पालन करून शाळा आणि वसतिगृहे सुरू करावीत, अशा सूचना आदिवासी विकास विभागाने दिल्या आहेत.

‘धरसोड’ धोरण

निर्णय घेणे आणि नंतर ते मागे घेणे, असे धरसोड धोरण शिक्षण विभागाचे आहे. यापूर्वीही शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक करणे, दिवाळीची सुट्टी, परीक्षा, शुल्कवाढीस स्थगिती असे निर्णय घेऊन मग ते मागे घेण्यात आले. प्रत्येक निर्णयानंतर संभ्रम, वाद निर्माण झाले. निर्णयापूर्वी सर्व घटकांना विश्वासात घेऊन, सर्व बाजूंनी विचार करण्यात येत नाही का? निर्णय घेतल्यानंतर शिक्षण विभाग त्यावर ठाम का राहात नाही? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेणे योग्य ठरेल. योग्य ती खबरदारी घेऊन, विद्यार्थ्यांचे आरोग्य, हित लक्षात घेऊन शाळा सुरू कराव्यात. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

– वर्षां गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

रा ज्य चि त्र . . .

* नागपूर शहरातील शाळा सुरू होणार. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याचा निर्णय पालक-शिक्षक समितीशी चर्चा केल्यावरच घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. ग्रामीण भागात सोमवारी शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

* कोल्हापूरमध्ये शनिवारी पुन्हा बैठक. नंतरच निर्णय होणार.

* पालकांची संमती असल्याशिवाय उत्तर महाराष्ट्रात शाळा सुरू केल्या जाणार नाहीत. या संदर्भात शनिवारी सर्व संबंधितांची बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी दिली.

* पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये शाळा सोमवारपासून सुरू होणार. जिल्ह्य़ाच्या अन्य भागातही सोमवारी शाळा सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.

* रायगड जिल्ह्य़ातील ९वी ते १२ वीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहेत.

* रत्नागिरीतील शाळांबाबत शनिवारी अंतिम निर्णय

* औरंगाबाद शहरातील शाळांबाबत उद्या शनिवारी निर्णय घेण्यात येणार आहे.

* स्थानिक स्थिती पाहून संस्था चालकांनी शाळांबाबत निणईय घ्यावा, असे आदेश सांगलीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.