शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा निर्णय

गृहपाठ न केल्याबद्दल शाळेत ५०० उठाबशा काढण्याची अमानुष शिक्षा झालेल्या कोल्हापूरच्या विजया निवृत्ती चौगुले या विद्यार्थिनीला शुक्रवारी रात्री केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शनिवारी सकाळी शिक्षणमंत्री विनोद तावडे रुग्णालयात जाऊन तिची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आणि तिच्या  उपचाराचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे सांगितले.

कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रुक येथील भावेश्वरी संदेश विद्यालयात इयत्ता आठवीत विजया चौगुले शिकत आहे. उठाबशाची शिक्षा दिल्यानंतर विजयाला दिल्यानंतर विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शुक्रवारी रात्री कोल्हापूरहून मुंबईत केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उठाबशाची शिक्षा देणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी देवणला पोलिसांनी अटक केली आहे.

विजयावरील उपचाराबाबत तिचे कुटुंबीय समाधानी आहेत. विजया लवकरच पूर्णपणे बरी होऊन पुन्हा शाळेत जाऊ शकेल. पण पुन्हा त्याच शाळेत जाण्याची विजयाची मानिसकता नसेल तर तिला तेथून जवळच्या दुसऱ्या शाळेत प्रवेश देण्यात येईल.

विजयाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विजयाला भेटल्यानंतर पत्रकारांना सांगितले. विजयाचे वडील त्याच शाळेत शिपाई म्हणून नोकरीला असून त्यांनाही त्या शाळेत नोकरी करायची नसेल तर त्यांनाही बाजूच्या शाळेत समायोजित केले जाईल, असेही तावडे म्हणाले.

विजयाची प्रकृती स्थिर

विजया चौगुले केईएम रुग्णालयात आल्यानंतर तिची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. मेंदूविकार आणि मानसोपचार विभागाच्या मदतीने तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.