भारतामध्ये खादी आणि हातमाग कापडाचे वैविध्य आढळून येत असतानाही कित्येक वर्षे उच्चभ्रु वर्तुळामध्ये पाश्चात्य आणि कृत्रिम धाग्यांचे कपडे वापरण्याची संस्कृती कायम राहिली आहे. हातमाग आणि खादी वस्त्रोद्यागाला चालना देण्यासाठी डिझायनर्स आणि कारागिरांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. ती लक्षात घेऊन यापुढे भारतीय कापडाच्या प्रसिद्धीसाठी आणि कारागिरांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी डिझायनर्सना वस्त्रोद्योग मंत्रालयाची सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले असल्याचे ‘फॅशन डिझायनिंग कॉिन्सल ऑफ इंडिया’चे(एफडीसीआय) संचालक सुनिल सेठी यांनी सांगितले.
‘एफडीसीआय’ वर्षांतून दोनदा दिल्लीमध्ये ‘अ‍ॅमेझॉन इंडिया फॅशन विक’चे आयोजन करते. या शोजमुळे फॅशन डिझायनर्सना एका छताखाली आपले काम ग्राहकांपर्यंत पोहचविण्याच्या संधी उपलब्ध होते. फॅशन व्यवसायाच्या सुरवातीच्या काळात शासनाकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याची डिझायनर्सची तक्रार होती. मागील काही वर्षांमध्ये फॅशन उद्योगाची घोडदौड पाहता, वस्त्रोद्योग मंत्रालय डिझायनर्सना मदत करण्यासाठी स्वत: पुढे येण्यास उत्सुक असल्याचे मत सुनिल सेठी यांनी व्यक्त केले. यंदाच्या फॅशन विकमध्ये खादी आणि हातमागावरच्या कापडापासून तयार केलेल्या कपडय़ांवर जास्त भर देण्यात आला होता. पाच दिवस चाललेल्या या सोहळ्याला भारत आणि परदेशी ग्राहकांनीही हजेरी लावली होती. यावेळी डिझायनर्सकडे १०० कोटीहून अधिकची उलाढाल झाल्याचे त्यांनी सांगितले.
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह सचिव डॉ. संजयकुमार पांडा यांनी या फॅशन विकला हजेरी लावून डिझायनर्सच्या कामाची माहिती घेतली. भारतातील हातमाग कारागिरांसोबत काम करण्यास उत्सुक डिझायनर्सना वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून मिळाल्याचे सुनिल सेठी यांनी सांगितले. निर्यातीमध्येही डिझायनर्सना मदत करण्याचे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून मिळाले आहे. त्रेसष्ठ डिझायनर्सच्या खादीवर आधारित कलेक्शनचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले होते. या कलेक्शन्सचे प्रदर्शन भारतभर करुन त्याची विक्री करण्याचा वस्त्रोद्योगाची योजनाही त्यांनी बोलून दाखविली. भारतातील केवळ १ टक्का लोक दैनंदिन आयुष्यात खादीचा वापर करत असून पुढील दोन वर्षांमध्ये तीन ते पाच टक्के करण्याचा विचार सुनिल सेठी यांनी बोलून दाखवला. तरुणांना हातमागाच्या तंत्राचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची ‘एफडीसीआय’ची संकल्पनाही त्यांनी मांडली.