महसुली उत्पन्न वाढत नसताना खर्चात वारेमाप वाढ झाल्याने होणारी तूट भरून काढण्याकरिता पेट्रोल आणि डिझेल दरात लिटरला दोन रुपये, मद्य, सिगारेट व शीतपेयांवरील करात पाच टक्के, तर सोने व हिऱ्यांच्या करात .२० टक्के वाढ करून सरकारने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. या करवाढीतून मार्चअखेर १६००कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न अपेक्षित असले तरी राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या पलीकडे गेल्याचे मानले जाते.
जागतिक बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्याने त्याचा फटका विक्रीकराला बसला आहे. लिटरला रुपयाने दर कमी झाल्यास महिन्याला पेट्रोलवर मिळणाऱ्या व्हॅटमध्ये २० कोटी, तर डिझेलवरील करात सुमारे १० कोटी रुपयांची सरासरी घट होते. गेल्या सप्टेंबरच्या तुलनेत यंदा पेट्रोल दरात सरासरी १०, तर डिझेलच्या दरात १७ रुपयांनी घट झाल्याने राज्याला फटका बसला आहे. दरमहा सरासरी ३०० कोटी रुपयांची घट होत असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
स्थानिक संस्था कर रद्द केल्याने सहा हजार कोटी, टोलची भरपाई ८०० कोटी आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याकरिता तीन हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. ही तूट भरून काढण्याकरिता पेट्रोल आणि डिझेल दरात ही वाढ झाली आहे. यामुळे मार्चअखेपर्यंत अतिरिक्त ८०० ते हजार कोटी रुपये उपलब्ध होतील, असा वित्त विभागाचा अंदाज आहे.
स्थानिक संस्था कर म्हणजेच एल.बी.टी. २५ महापालिकांमध्ये रद्द केला असला तरी पेट्रोल आणि डिझेलवर तो आकारला जात होता. या सर्व महापालिकांमध्ये इंधनावरील एलबीटी रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र दोन रुपये अतिरिक्त अधिभार आकारला जाणार आहे. ठाणे, पुणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईसह सर्व पालिकांमध्ये पेट्रोलवरील एल.बी.टी. रद्द झाल्याने एकदम दोन रुपयांचा बोजा पडणार नाही. एलबीटी रद्द झाल्याने काही प्रमाणात इंधनावरील लिटरचा दर कमी होईल. ठाण्यात इंधनावर दोन टक्के एलबीटी आकारला जातो.

देशभरातही डिझेल दरात वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवार मध्यरात्रीपासून डिझेल दरात लिटरमागे ५० पैशांनी वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात मात्र कोणतीही वाढ होणार नाही. महाराष्ट्र सरकारने डिझेल दरात बुधवारीच दोन रुपयांनी वाढ केल्याने आता महाराष्ट्रात डिझेल लिटरमागे अडीच रुपयांनी महागले आहे.

मुंबईत पेट्रोल सर्वात महाग
मुंबईत पेट्रोलवर तब्बल २६ टक्के व्हॅट आणि तीन रुपये अधिभार आकारला जाईल. परिणामी, राज्यात पेट्रोल आणि डिझेल हे मुंबईत सर्वाधिक महाग असेल.

२६ टक्क्य़ांपर्यंत व्हॅट
मुंबई, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती आणि नंदुरबार या आठ शहरांमध्ये पेट्रोलवर २६ टक्के तर डिझेलवर २४ टक्के व्हॅट आणि तीन रुपये अधिभार बुधवारी मध्यरात्रीपासून आकारला जाईल. ही आठ शहरे वगळता राज्याच्या अन्य विभागात पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि तीन रुपये अधिभार तर डिझेलवर २१ टक्के व्हॅट आणि तीन रुपये अधिभार आकारण्यात येणार आहे. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, कर्नाटक आणि केरळ या राज्यांपेक्षा राज्यातील व्हॅटचे प्रमाण कमी असल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला.

दारू, सिगारेट, शीतपेयेही महागली
एलबीटी रद्द झाल्यावर दारू, सिगारेट आणि शीतपेयांवरील पाच टक्के कर कमी झाला होता. पण त्याचा फायदा ग्राहकांना दिला जात नव्हता. राज्यात आता सरसकट दारू, सिगारेट आणि शीतपेयांवरील करात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. सणासुदीच्या हंगामात सोने खरेदी वाढते हे लक्षात घेऊनच सरकारने सोने आणि हिऱ्यांवरील कर एक टक्क्यांवरून १.२० टक्के केला आहे. या करवाढीमुळे अतिरिक्त ५०० ते ६०० कोटी रुपये मिळतील, अशी शक्यता आहे.

‘वर्धापन दिन जाहिरातींसाठी करवाढ’
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झाले असताना पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करून भाजप सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. या महिनाअखेर सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याने मोठय़ा प्रमाणावर जाहिरातबाजी करण्याची योजना असून त्यासाठीच करवाढ करण्यात आल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.