तीन कोटींहून अधिक झाडे लावण्याचा विक्रमी संकल्प सोडलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून आणि महापालिकेकडून त्यांचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दादरमध्ये उभारलेल्या उद्यानाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी गेल्या वर्षी उद्यानाच्या उद्घाटनाच्या वेळी लावलेली झाडे पाण्याअभावी जळून गेली असून उद्यानाची दुर्दशा आहे. गर्दुल्ल्यांचा व दारुडय़ांचा अड्डा बनलेल्या या उद्यानात वृक्षारोपण करून सुशोभीकरण करावे, याकडे राज्यात व महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी लक्ष दिलेले नाही.

महापालिकेच्या सुमारे १२ एकर जागेत दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या उद्यानासाठी पुरेसा निधी मिळत नव्हता व दुर्लक्ष होत होते. मलनिस्सारण विभागाकडून उद्यान विभागाकडे जागेचे हस्तांतरण झालेले नाही आणि विकास आराखडय़ात उद्यानाचे आरक्षणही नाही. उद्यानाच्या विकासासाठी पाण्याचीही सोय नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस, खासदार पूनम महाजन यांनी लावलेली झाडे जळून गेली. ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त दिल्यावर काही प्रमाणात कामे हाती घेण्यात आली असली तरी उद्यानाची दुर्दशा आहे.   परिसरातील झोपडपट्टीवासीयांकडून उद्यानातील शौचालयाचा वापर केला जातो. आवाराची भिंतही पाडण्यात आली होती. पूनम महाजन यांच्यासह भाजप नेत्यांकडून पुरेसा पाठपुरावा होत नसल्याने या विस्तीर्ण उद्यानाची मात्र वाट लागली आहे. त्यामुळे राज्यात वृक्ष लागवडीच्या विक्रमाचा संकल्प सोडलेल्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष दिले तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या उद्यानाची स्थिती सुधारण्यास हातभार लागेल, असे भाजपचे कार्यकर्तेच बोलू लागले आहेत.

  • बंगलोर येथील ‘बॉटनिकल गार्डन’च्या धर्तीवर दुर्मीळ वनस्पती, झाडे लावण्याबरोबरच दुर्मीळ वनस्पती, फुलांची प्रदर्शने आयोजित करण्याचेही नियोजित आहे. त्या दृष्टीने प्रिझम आकारात बांधणीही करण्यात आली आहे. स्लाइड शो, म्युझिकल कारंजे व अन्य बाबी आयोजित करता येतील अशी रचना आहे.
  • स्लाइड शो, म्युझिकल कारंजे व अन्य बाबी आयोजित करता येतील अशी रचना आहे. मात्र पुरेसा निधी नाही, कोणालाही रस नाही, यामुळे उद्यानाची दुर्दशा आहे.