सामान्य प्रशासन विभागाचे सर्व कार्यालयांना आदेश

शासकीय सेवेतील रिक्त जागा पदोन्नतीने भरण्यात याव्यात, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना व कार्यालयांना दिले आहेत. त्यासाठी वेळापत्रकच ठरवून दिले आहे. दर वर्षी ३० नोव्हेंबपर्यंत पदोन्नतीने रिक्त जागा भरावयाची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे, असे या संदर्भात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

शासकीय सेवेतील काही जागा सरळसेवा भरतीने व काही जागा पदोन्नतीने भरल्या जातात. त्यासाठी निरनिराळ्या संवर्गासाठी वेगवेगळे प्रमाण ठरिवण्यात आले आहे. विविध विभागांतील व कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी दर वर्षी १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट या कालावधीत रिक्त होणारी पदे विचारात घेऊन निवडसूची तयार केली जाते. परंतु निवडसूची तयार करण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण होत नाही, त्यामुळे पदोन्नतीने भरावयाच्या जागा रिक्तच राहतात, त्याचा प्रशासनातील कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे, असे निदर्शनास आले आहे. आता या पुढे पदोन्नतीने रिक्त जागा भरण्यासंदर्भात सर्व विभागांसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.

प्रत्येक वर्षांच्या ३१ मार्चपर्यंत अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावयाची आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ३० जूनपर्यंत गोपनीय अहवाल प्राप्त झाले पाहिजेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करणे, विभागीय परीक्षा किंवा व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे, मत्ता व दायित्व विविरणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र, इत्यादी सेवाविषयक तपशील ३१ जुलैपर्यंत द्यावयाचा आहे. रिक्त पदांची संख्या व त्यांतील आरक्षण निश्चित करून घेण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाला निवडसूचीचे प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता नाही, अशा प्रकारणांत ३० सप्टेंबपर्यंत विभागीय पदोन्नतीच्या बैठका घेऊन १५ ऑक्टोबपर्यंत पदोन्नतीचे आदेश काढायचे

आहेत.  सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेची आवश्यकता आहे, अशा प्रकरणात प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी करून व सहमती दर्शवून ते ३१ ऑक्टोबपर्यंत संबंधित विभागांकडे परत पाठवायचे आहेत. त्यानंतर विभागीय संवर्गाची निवड, नागरी सेवा मंडळाच्या शिफारशींनुसार आवश्यकता असेल तिथे मंत्री वा मुख्यमंत्र्यांची मान्यता घेणे, ही प्रक्रिया पूर्ण करून ३० नोव्हेंबपर्यंत पदोन्नतीचे आदेश काढायचे आहेत.