संदीप आचार्य
मुंबई: जगभरात निर्माण झालेल्या करोना वादळावर मात करणारे औषध वा लस तयार करण्यात जगभरातील शेकडो संशोधक व संस्था अहोरात्र संशोधनात व्यस्त आहेत. लाखो लोकांचे बळी घेणाऱ्या या करोना विषाणूचा सामना करणारे ठोस औषध वा लस अजून तरी आधुनिक वैद्यकांच्या हाती लागलेले नसताना करोनाचा संभावित वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आता प्राचीन आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथी औषधांचा वापर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करण्याच्या प्रस्तावावर मान्यतेची मोहर उमटवली आहे.
जगभरात करोनाची लागण लक्षावधी लोकांना झाली असून आतापर्यंत लाखो लोकांचे मृत्यू झाले आहेत. भारतातही करोनाने लोक त्रस्त झाले असून महाराष्ट्रात त्यातही मुंबईत देशातील सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात जवळपास साठ हजाराहून अधिक रुग्णसंख्या झाली आहे तर मुंबईत जवळपास ३६ हजार करोनाचे रुग्ण आढळले आहेत. आगामी पंधरा दिवसात आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. वाढते रुग्ण लक्षात घेऊन रुग्णालयात खाटा वाढवणे, अतिदक्षता विभागात खाटा तयार ठेवणे, तात्पुरती रुग्णालये उभारणे तसेच दीड लाख लोकांसाठी जून १५ पर्यंत क्वारंटाइन केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. एकीकडे ही तयारी सुरु असताना दुसरीकडे कोमॉर्बीडिटी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे तसेच अॅलोपथीच्या प्रभावी औषधांच्या माध्यमातून उपचार करण्याबरोबरच रुग्णालयातील खाटेशेजारी ऑक्सिजनची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर आयुर्वेदिक व होमिओपॅथी डॉक्टरांनी व त्यांच्या विविध संघटनांनी करोना रुग्णांवर आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधांचा वापर करू देण्याची मागणी जोरात लावून धरली. यातील बहुतेक डॉक्टरांचे म्हणणे होते आमच्या औषधांचा फायदा रुग्णाना किंवा संभाव्य रुग्णामधील प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत करतो. तसेच कोणतेही साईड इफेक्ट या औषधांना नसल्याने ती देण्यात यावी. ‘आयुष’ नेही करोना रुग्णांना होमिओपॅथी व आयुर्वेदिक औषधे द्यावी, अशी भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. करोना रुग्णांना होमिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानी औषधे देण्याबाबतचा निर्णय ही समिती घेणार होती. डॉ. तात्याराव लहाने यांच्या समितीने करोना रुग्ण तसेच संभाव्य रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने होमिओपॅथी व आयुर्वेदिक तसेच युनानी औषधे देता येतील असे आपल्या अहवालात नमूद केले आहे. तसेच यातून करोना रुग्णांना बरे करतो असा कोणताही दावा केला जाणार नाही हेही स्पष्ट केले आहे.
याबाबत होमिओपॅथी डॉक्टर विद्यासागर उमाळकर यांना विचारले असता “एक चांगला निर्णय असून होमिओपॅथी औषधांचा करोना रुग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल, असे त्यांनी सांगितले. आमच्या औषधातील सुक्ष्मातीसुक्ष्म औषधी द्रव्ये मुळातून काम करतात. यातून करोना नसलेल्या रुग्णांमधीलही प्रतिकारशक्ती वाढून करोनाची लागण होण्याची शक्यता दूरावण्यास मदत होते” असे सांगून डॉ. उमाळकर म्हणाले, “अर्सेनिक, कॅमकोर व सेपीया आदी औषधे वापरल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यास निश्चित मदत होईल.” “होमिओपॅथीच्या या औषधांचा करोना रुग्णांना तसेच रुग्ण नसलेल्यांची प्रकृती चांगली ठेवण्यास निश्चित मदत होते”, असे कल्याण येथील डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले. ‘कल्याण होमिओपॅथी डॉक्टर फाऊंडेशन’च्या माध्यमातून आम्ही करोनाची काळजी घेण्यासाठी आतापर्यंत जेवढ्यांना औषधे दिली त्यांची तपशीलवार नोंद ठेवलेली आहे. करोना रुग्णांसाठी मदत करणाऱ्या जवळपास सहाशे कार्यकर्त्यांना आम्ही होमिओपॅथीची औषधे दिली असून यातील एकालाही करोना झालेला नाही. तसेच करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनाही औषधे दिली असून त्यांचीही प्रकृती चांगली असून या सार्या नोंदी तपशीलवार महापालिका व संबंधित यंत्रणेला आम्ही देत आहोत, असे डॉ. विद्याधर गांगण यांनी सांगितले.
“आमच्या समितीने याबाबत संबंधित विद्याशाखेच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी सखोल चर्चा करून होमिओपॅथी, आयुर्वेदिक व युनानीची कोणती औषधे रुग्णांना द्यायची हे निश्चित केले असून संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करूनच ही औषधे घ्यायची” असल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. “या औषधांमुळे करोना प्रतिबंधास मदत होण्याची शक्यता आहे व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वापरावी असे समितीच्या अहवालात नमूद केले आहे. तसेच ताप, घसा खवखवणे अथवा अन्य लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यास अहवालात स्पष्ट केले आहे” असेही डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. यामुळे करोनाच्या लढाईत आता होमिओपॅथी, आयुर्वेद व युनानी औषधांच्या वापरावर शासनमान्यतेची मोहर उमटली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 30, 2020 2:50 pm