राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटणार असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. याचबरोबर राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबरपर्यंत (सोमवार) बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं आहे.  या अगोदर फडणवीस यांनी राज्यात भाजपाच्याच नेतृत्वात सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.

राज्यपालांकडून भाजपाला यासंदर्भात पत्र पाठवण्यात आलं असल्याची माहिती आहे. राज्यपालांकडून आलेल्या पत्रावर उद्या भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय होणार असल्याचं भाजपा नेते सुधीर मुगंटीवार यांनी सांगितलं आहे. राज्यपालांनाी निमंत्रण देणं हा घटनात्मक प्रक्रियेचा भाग आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपा – शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारचा दिवस महत्वपूर्ण राजकीय घडामोडींचा होता. १३व्या विधानसभेची मुदत शनिवारी मध्यरात्री संपुष्टात येणार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सादर केला. तर राज्यपालांनी पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याची सूचना फडणवीस यांना केली होती.

राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर टीकास्त्र डागले. चर्चेची दारे शिवसेनेनेच बंद केली. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी शिवसेनेचा दावा खोटा ठरवला. तसेच, राज्यात भाजपाच्या नेतृत्वातच सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला होता.  फडणवीस यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांचे आरोप फेटाळले होते.