दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत २५०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून, केंद्र सरकारकडून आतापर्यंतची सर्वाधिक ३०४९ कोटी रुपयांची मदत मिळाली असल्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांसमोर केलेल्या अभिभाषणात सांगितले. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवारी सुरुवात झाली. परंपरेप्रमाणे या अधिवेशनाची सुरूवात दरवेळी राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. राज्यपालांचे अभिभाषण सुरू होताच विरोधकांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून घोषणा देण्यास सुरुवात केली. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे’, ‘लावण्या सुरू, छावण्या बंद’ अशा घोषणा देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. दुष्काळाचा मुद्दाच अधिवेशनाच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले.
राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक भाग दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. पण दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी ज्या तातडीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याबद्दल सरकार स्तरावर उदासीनता असल्याचे दिसते. यामुळे सरकारचा निषेध करावा तितका थोडा आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले होते.
राज्यपालांनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे
राज्यात सलग चौथ्यावर्षी दुष्काळ
दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी केंद्र सरकारकडून ३०४९ कोटी रुपयांची मदत
केंद्र सरकारकडून आतापर्यंतची सर्वाधिक मदत
दुष्काळग्रस्तांसाठी २५०० कोटी रुपयांचे वाटप
दुष्काळी भागातील नागरिकांचे ३३ टक्के वीजबील माफ
राज्य सरकारने गेल्यावर्षी महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना सुरू केली.
एकूण पाच हजार गावांमध्ये योजना राबविण्यात येते आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त चालू वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये वास्तव्य केलेले निवासस्थान सरकारने विकत घेतले असून, त्याचे राष्ट्रीय स्मारक करण्यात येणार