पत्राद्वारे भाजपकडे विचारणा;  दोन दिवसांची मुदत

तेराव्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात आली असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकार स्थापण्याबाबतची प्रक्रिया सुरू केली. सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपची सरकार स्थापण्याची तयारी आहे का, अशी विचारणा करणारे पत्र शनिवारी राज्यपालांनी पक्षाला पाठविले. त्यावर उत्तर देण्यासाठी भाजपला दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

निवडणूक निकालाला दोन आठवडे उलटले तरी कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा एकापेक्षा जास्त पक्षांच्या युती किंवा आघाडीने सरकार स्थापण्याचा दावा केलेला नाही. शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असल्याने निर्माण झालेला पेच अद्याप सुटलेला नाही. त्यातच तेराव्या विधानसभेची मुदत शनिवारी संपुष्टात आली. या पाश्र्वभूमीवर सरकार स्थापण्याच्या संदर्भात वेगवेगळे पर्याय राज्यपालांकडून उलगडले जातील. ही प्रकिया राज्यपालांनी सुरू केली आहे.

भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांनी पत्र पाठवले आहे. या पत्राला उत्तर देण्यास सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सरकार स्थापन करणार की नाही, हे लेखी स्वरूपात भाजपला राज्यपालांना कळवावे लागेल. भाजपने असमर्थता व्यक्त केल्यास शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले जाईल.

भाजपकडे संख्याबळाचा अभाव

भाजपचे १०५ आमदार निवडून आले असून, अपक्ष आणि छोटय़ा पक्षांचा पाठिंबा लक्षात घेतल्यास ११९ सदस्यांचा पाठिंबा आहे. १४५हा जादूई आकडा गाठण्यासाठी तीनपैकी कोणत्या तरी राजकीय पक्षाचा पािठंबा घ्यावा लागेल. पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाटय़ात येऊ नये म्हणून दोनतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर करणे बंधनकारक आहे. हेसुद्धा अशक्यप्राय वाटते. यामुळेच सध्या तरी सरकार स्थापण्याचा दावा करायचा नाही, अशी भाजपची भूमिका आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर सरकार स्थापण्यासाठी संख्याबळ जमविण्याची भाजपची योजना आहे.

भाजप नेत्यांच्या बैठकीत आज निर्णय

राज्यपालांच्या पत्रानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीत सरकार स्थापण्याबाबत विचार केला जाईल, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. शिवसेनेने अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप आणि शिवसेनेत तिढा निर्माण झाला. शिवसेनेमुळे सरकार स्थापन होऊ शकले नाही, असे खापर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिवसेनेवर फोडले. तर मुख्यमंत्री पदाबाबत आपल्याला खोटे पाडल्यानेच चर्चेची दारे बंद केल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. भाजप आणि शिवसेनेत कमालीची कटुता निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर उभयतांमध्ये लगेच समझोता होण्याची शक्यता कमी आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार स्थापण्याचा पर्याय असला तरी शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व तयार नाही. यातच राममंदिरावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्याने शिवसेनेला पाठिंबा देणे काँग्रेसला शक्य होणार नाही.

‘निमंत्रण’ कोणत्या निकषांवर?

सरकार कसे स्थापन करावे, याबाबत न्या. सरकारिया आयोगाने घालून दिलेल्या निकषांनुसार निवडणुकीत ‘सर्वात मोठय़ा’ ठरलेल्या राजकीय पक्षास राज्यपाल सत्तास्थापनेची पहिली संधी देऊ शकतात. पण, त्यासाठी संबंधित राजकीय पक्षाने तसा दावा करावा लागतो. येथे भाजपने तसा दावा केलेला नाही. अशा वेळी राज्यपालांची भाजपला संधी देण्याची कृती घटनाबाह्य़ ठरते.

पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री