28 October 2020

News Flash

तुम्ही धर्मनिरपेक्ष बनलात का?

प्रार्थनास्थळे बंद ठेवल्यावरून राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना अजब सवाल

प्रार्थनास्थळे बंद ठेवल्यावरून राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना अजब सवाल; घटनेतील धर्मनिरपेक्षता मान्य नाही का? मुख्यमंत्र्यांचा संयत, सडेतोड प्रतिसवाल

‘‘हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देव-देवतांना टाळेबंदीत ठेवण्यात आले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात?’’ असा अजब सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे विचारला. त्यावर ‘‘तुम्हाला घटनेतील धर्मनिरपेक्षता मान्य नाही का?’’ असा सडेतोड प्रतिसवाल करत मुख्यमंत्र्यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे राज्यपालांना ठणकावले.

भाजपने राज्यभरातील मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन सुरू केले असतानाची वेळ साधत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रार्थनास्थळे उघडण्यावरून तिरकस टोलेबाजी करणारे पत्र पाठवले आहे. या पत्रात कोश्यारी यांनी देव-देवता अजूनही टाळेबंदीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले.

जूनच्या पहिल्या आठवडय़ात समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेशी संवाद साधताना ‘पुनश्च हरिओम’ची घोषणा करीत टाळेबंदी हा शब्द कचरापेटीत फेकण्याची लोकप्रिय घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्या वेळी गेल्या काही महिन्यांच्या टाळेबंदीमुळे त्रासलेल्या नागरिकांना आशेचा किरण दिसला होता. परंतु या घोषणेच्या चार महिन्यांनंतरही दुर्दैवाने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू होऊ शकली नाहीत, अशी आठवण करून देत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली.

टाळेबंदी शिथिलीकरणांतर्गत ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा राज्यातील जनतेशी संवाद साधताना धार्मिक स्थळांसाठी टाळेबंदी कायम ठेवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. एकीकडे राज्यातील मद्यालये, उपाहारगृहे आणि रिसॉर्ट सुरू केले जात आहेत. त्याच वेळी आपल्या देव-देवतांना मात्र टाळेबंद करून ठेवले आहे. देशभरात अनेक ठिकाणी प्रार्थनास्थळे उघडण्यात आली. दिल्लीत तर ८ जूनपासून प्रार्थनास्थळे उघडली. तरीही त्या ठिकाणी करोनाचा प्रसार झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्याबाबत आवश्यक ती खबरदारी घेऊन राज्यातील प्रार्थनास्थळे उघडावीत’’, अशी विनंती राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या पत्राद्वारे केली आहे.

गेल्या तीन महिन्यांत मंदिरे सुरू करावीत, ही मागणी करणारे धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय नेते मंडळी असे अनेक जण आपल्याला भेटले. त्यांची निवेदनेही पत्राबरोबर जोडली आहेत, असेही राज्यपालांनी नमूद केले.

राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्र्यांनी संयत, पण सडेतोड प्रत्युत्तर दिले. मंदिरे- प्रार्थनास्थळे न उघडणे म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि ती उघडणे म्हणजे हिंदुत्व असे तुम्हाला वाटते का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात के ला. प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी करण्याबाबत राज्यपालांनी पाठवलेली संघटनांची पत्रे ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहेत याकडेही ठाकरे यांनी राज्यपालांचे लक्ष वेधत कोश्यारी हे पक्षीय राजकारण करत असल्याचेही अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे.

जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथमकर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जशी एकदम टाळेबंदी लागू करणे चुकीचे तसेच ती एकदम उठवणेही अयोग्यच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

प्रार्थनास्थळे उघडण्याच्या आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असून सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना दिले आहे.

एकीकडे राज्यातील मद्यालये, उपाहारगृहे सुरू केली जात आहेत. त्याच वेळी आपल्या देव-देवतांना मात्र टाळेबंद करून ठेवण्यात आले आहे. तुम्ही हिंदुत्ववादी आहात. राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत तुमची श्रद्धा जाहीरपणे व्यक्त केली. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही पूजा केली. मग प्रार्थनास्थळे खुली न करण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक ‘धर्मनिरपेक्ष’ बनला आहात?

– भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

आपण राज्यपालपदाची शपथ ज्या राज्यघटनेनुसार घेतली त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा असलेली धर्मनिरपेक्षता तुम्हाला मान्य नाही का? मंदिरे – प्रार्थनास्थळे न उघडणे म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि ती उघडणे म्हणजे हिंदुत्व असे तुम्हाला वाटते का? माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला किंवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसतखेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 12:16 am

Web Title: governor strange question to cm over closure of places of worship abn 97
Next Stories
1 राजकीय उत्तराची गरज नव्हती – फडणवीस
2 लॉकडाउननंतर पहिल्यांदाच पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल
3 सुटय़ा मिठाईबाबत तारखेची सक्ती जनहितार्थच!
Just Now!
X