05 August 2020

News Flash

‘विद्यापीठाच्या परीक्षांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या’

उच्चशिक्षणमंत्र्यांना अनुचित हस्तक्षेपाबाबत समज देण्याचे राज्यपालांचे निर्देश

(Express Photo by Kamleshwar Singh)

विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी सूचना राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली असून परीक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसताना केलेल्या हस्तक्षेपाबाबत उच्चशिक्षणमंत्र्यांना समज द्यावी, असेही कोश्यारी यांनी म्हटले आहे.

विद्यापीठाच्या फक्त अंतिम वर्षांच्याच परीक्षा घेण्याचा पर्याय विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्यानंतर राज्यातील कुलगुरू आणि अधिकाऱ्यांच्या समितीनेही अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या आयोगाचा निर्णय कायम ठेवला. त्यानुसार विद्यापीठांनी जुलैमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याची तयारीही सुरू केली. मात्र, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी भूमिका घेतली. त्या अनुषंगाने आयोगाला पत्र लिहिले आणि आयोगाचा निर्णय न आल्यास राज्याच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असेही जाहीर केले. या सर्व प्रकारावर राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने राज्यपाल कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. ‘विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अधिक वेळ न घालवता अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा प्रश्न सोडवावा. परीक्षा न घेणे हा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि विद्यापीठ कायद्याचा भंग आहे,’ असे पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. ‘विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा आणि त्यांना पदवी देण्याचा अधिकार विद्यापीठांना आहे. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पदव्या देणे हे अनैतिक आहे. विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण, नोकरीच्या संधी यांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो’ असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:44 am

Web Title: governors instructions to the minister of higher education to give an understanding about inappropriate interference abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 कोणत्या रुग्णांसाठी किती खाटा?
2 कामगार नेते दादा सामंत यांची गळफास घेऊन आत्महत्या
3 राज्यात २९४० नवीन रुग्ण
Just Now!
X