९०० पैकी ४९३ पथकांकडून गोविंदांचा विमा; दहीहंडी आयोजक मात्र उदासीन

दहीहंडी उत्सवाला दोन दिवस उरले असतानाही शहरातील ९०० हून अधिक गोविंदा पथकांपैकी ४९३ पथकांनीच अपघाती विमा उतरवला आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान उंच मानवी थरावरून कोसळून किंवा अन्य दुघर्टनेत गोविंदा जखमी अथवा मृत्युमुखी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन विमा काढणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने सूचित केले आहे. मात्र, तरीही दहीहंडी आयोजक विमा काढण्याबाबत यंदाही उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कमीत कमी रुपयांमध्ये म्हणजे प्रत्येकी ७५ रुपयांमध्ये विमा ओरिएन्टल इन्श्युरन्स कंपनीकडून दिला जात असल्याने मुंबई शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व गोविंदा पथके याच कंपनीकडे विमा काढतात. कंपनीकडून पथकांतील प्रत्येक व्यक्तीमागे १० लाख रुपयांचा विमा दिला जातो. यामध्ये एक लाखापर्यंतचा रुग्णालयीन खर्च देण्यात येतो. तर आयोजकांसाठीही दहीहंडी आयोजित केलेल्या एक किलोमीटर परिसराचा विमा काढण्याचीही योजना कंपनीने दिलेली आहे. यात प्रत्येक पथकामागे २५० रुपयांचा विमा उतरविण्यात येतो. हंडीच्या आयोजित केलेल्या ठिकाणी पथकाच्या व्यक्तीला इजा झाल्यास त्याला ही विम्याची सेवा दिली जाते, असे दहीहंडी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष अरुण पाटील यांनी सांगितले.

गुरुपौर्णिमेपासून दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचण्याचा पथकांचा सराव सुरू होतो. पथकांसाठी दिला जाणाऱ्या विम्याचा कालावधी हा गुरुपौर्णिमेपासून ते हंडीच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत असतो. परंतु बहुतांश पथके अगदी शेवटच्या दिवसांमध्ये परवानग्या मिळणे कठीण होत असल्याने विमा काढण्याकडे धाव घेतात. गुरुवापर्यंत आयोजक आणि पथके असे एकत्रितरीत्या ४१९ पथकांचा विमा उतरविला असून यामध्ये ४५ हजार १८३ गोविंदांना सुरक्षा कवच प्राप्त झाले आहे. यात २८० पथकांनी स्वतंत्रपणे विमा काढला आहे, तर २३५ पथकांनी विविध संस्थांच्या मदतीने विमा उतरविलेला आहे. यात आयोजकांची संख्या मात्र जेमतेम सहा इतकी आहे.

‘गेल्या महिनाभरात आमच्याकडे २५० पथकांनी विमा उतरविला आहे. कालपासून पथकांची गर्दी वाढली आहे. मंगळवारी दिवसभरात २५० पथकांनी विमा उतरविला आहे. खरंतर सरावापासूनच पथकांनी हा विमा घेतला तर सरावादरम्यान कोणाला इजा झाल्यास त्यालाही या विम्याचा फायदा घेता येईल. यामागे वास्तविक विमा काढणेही पथकांना परवडणारे नसल्याने आर्थिक साहाय्यासाठी संस्थांचा शोध घेतला जातो. त्यामुळे देखील यासाठी उशीर होत असल्याचे पथकांकडून सांगितले जाते. यावर्षी एक हजाराहून अधिक पथके विमा उतरविण्यासाठी येतील,’ अशी अपेक्षा ओरिएन्टल इन्श्युरन्स कंपनीचे सचिन खानविलकर यांनी व्यक्त केली.

विमा काढण्यासाठी आलेली पथके बऱ्याचदा १४ वर्षांखालील वरच्या गोविंदाचा विमा काढण्यासाठी येतात. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १४ वर्षांखालील मुलांना बंदी असल्याने त्यांचा विमा काढण्यास नकार दिला जातो. त्या वेळी मग पथके १४ वर्षांवरील मुलगा आम्ही तयार करू असे सांगत दुसऱ्या मुलाचा विमा उतरवितात. विम्याच्या सक्तीने का होईना १४ वर्षांखालील मुलांना वरच्या थरावर चढविण्याचे प्रमाण कमी झाल्याचे विमा कंपनीकडून सांगण्यात आले.

आयोजकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

प्रत्येक गोविंदामागे ७५ रुपयाचा जरी हिशेब केला तरी एका पथकाला ७५०० हून अधिक खर्च येतो. तुलनेने प्रत्येक पथकामागे २५० रुपये खर्च आयोजकांना विमा उतरविण्यासाठी येतो. तेव्हा दहीहंडी उत्सवावरील इतर वारेमाप खर्चामध्ये कपात करून गोविंदाला सुरक्षा देण्यासाठी आयोजकांनी विमा काढला तर अधिक फायदेशीर होईल. आम्ही दरवर्षी आयोजकांना यासाठी विनंती करत असतो. परंतु प्रत्यक्षात मात्र यासाठी मोजकेच आयोजक पुढाकार घेतात, अशी खंत दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी सांगितले.