२००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी अभिनेता गोविंदा याने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि बांधकाम व्यावसायिक हितेन ठाकूर यांची मदत घेतल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी केला आहे. नाईक यांनी त्यांच्या ‘चरैवेति..चरैवेति’ या आत्मचरित्रात हा दावा केला आहे. मागील आठवड्यात मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला होता. राजकीय नेत्यांच्या जुगलबंदीमुळे हा सोहळा चांगलाच गाजला होता. दरम्यान, आज विविध वृत्तवाहिन्यांवरून यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यामुळे ‘चरैवेति..चरैवेति’  हे पुस्तक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
पद टिकविण्यासाठी पंतांचा कानमंत्र 
१९९९ ते २००४ या काळात केंद्रीय मंत्री राहिलेल्या राम नाईक यांनी पुस्तकात म्हटले आहे की, खासदारकीच्या तीनवेळच्या कारकीर्दीत मी मुंबईसाठी खूप काही केले होते. त्यामुळे २००४ साली उत्तर मुंबई मतदासंघात गोविंदाकडून ११ हजार मतांनी स्वीकारावा लागलेला पराभव मी पचवू शकलो नव्हतो. पराभवाच्या या कटू आठवणींच्या आणखी खोलात जाताना राम नाईक यांनी गोविंदा दाऊद आणि हितेंद्र ठाकूर यांचा मित्र असल्याचे सांगितले. गोविंदाने दहशतीने मतदारांची मते आपल्या बाजुला वळविण्यासाठी या दोघांचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप राम नाईक यांनी पुस्तकात केला आहे. दरम्यान, गोविंदाने हे सर्व आरोप फेटाळले असून, मला जनतेने विजयी केल्याचे सांगितले. मला जनतेने विजयी केले होते. त्यावेळी मला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नव्हती. अशा प्रकारचे आरोप करुन त्या मतदारासंघातील लोक अंडरवर्ल्डला सामील होते, असे राम नाईकांना म्हणायचे आहे. पण त्यांनी हे बोलून कोणाचाही अपमान करु नये. आता मी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत असताना, नाईक यांनी माझे नाव खराब करु नये. तसेच माझ्या कामात अडथळा आणू नये, असे गोविंदाने सांगितले.