दमदार पावसामुळे भातसा धरणात १ लाख दशलक्ष लिटर भर; पालिकेच्या विनंतीनंतर निर्णय
असमाधानकारक पावसामुळे भातसा धरणात अपुरा पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे ४० टक्के पाणीकपात लागू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच राज्य सरकारनेच ४० टक्के पाणीकपातीचा निर्णय मागे घेतला आहे.
भातसा धरणातून दररोज मुंबईला २१२० दशलक्ष लिटर आणि ठाण्याला २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यंदा अपुऱ्या पावसामुळे भातसा धरणातील जलसाठय़ात गेल्या वर्षीच्या तुलनेत तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे ४० टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने ५ सप्टेंबर २०१५ रोजी दिले होते. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरणात १ लाख दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. राज्य सरकारने ४० टक्के कपात लागू करण्याचे आदेश देण्यापूर्वीच महापालिकेने मुंबईमध्ये २० टक्के पाणीकपात लागू केली असून राज्य सरकारने आपल्या आदेशांचा फेरविचार करावा, अशी विनंती मुंबई महापालिकेने राज्य सरकारला केली होती. मात्र त्याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. तसेच ४० टक्के पाणीकपात लागूही करण्यात आली नव्हती. भाजप आमदार आशीष शेलार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि ४० टक्के कपातीचा फेरविचार करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी यांनी पाणीकपातीच्या आदेशाला स्थगिती दिली. सध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पालिकेने तलावांतील जलसाठय़ाचा आढावा घेऊन पाणीकपातीबाबत फेरविचार करावा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

स्थगिती आदेशाबाबत पालिका अनभिज्ञ
राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने पाणीकपातीबाबत पालिकेला पत्र पाठविले होते, मात्र त्या पत्रामध्ये ४० टक्के पाणीकपात लागू करण्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले नव्हते. त्यामुळे मुंबईत ४० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली नाही. आता राज्य सरकारने ४० टक्के कपातीला स्थगिती दिल्याबाबतचे पत्र पालिकेला अद्याप मिळालेले नाही, असे पालिकेच्या जल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.