जवळपास ८० लाखांहून अधिक मुंबईकरांच्या खिशाला भलेमोठे भोक पाडणाऱ्या रेल्वेच्या दरवाढीविरोधात जनतेत उसळलेल्या संतापासमोर मोदी सरकारला अखेर नमते घ्यावे लागले. आज, बुधवारपासून उपनगरीय रेल्वे पासच्या दरांमध्ये होणारी तब्बल १०० टक्क्यांची दरवाढ सरकारने मागे घेतली. आता मुंबईकरांना फक्त १४.२ टक्के दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. त्यातही दिलाशाची बाब म्हणजे द्वितीय दर्जाच्या साध्या तिकिटांमध्ये ८० किलोमीटपर्यंत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र इतर सर्व प्रकारच्या तिकिटांसाठी १४.२ टक्क्यांची भाडेवाढ लागू होणार आहे. ही भाडेवाढ २८ जूनपासून लागू होईल.
काँग्रेस सरकारने कारकिर्दीच्या अखेरच्या काळात तयार केलेल्या मात्र स्थगिती दिलेल्या रेल्वे दरवाढीच्या पत्रकाला मोदी सरकारने जशीच्या तशी मान्यता देऊन ही दरवाढ २० जून रोजी लागू केली. या दरवाढीनुसार द्वितीय दर्जाच्या मासिक पासमध्ये १०० टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे सध्या ११५ रुपयांच्या घरात असलेला पास थेट ३३० रुपयांवर पोहोचला होता. तसेच प्रथम श्रेणीचा पास या पासच्या चौपट करण्यात आल्याने सामान्य मुंबईकरांना मोठा फटका बसणार होता.
मात्र मुंबईकरांनी या दरवाढीला विरोध करत आपला असंतोष खुलेआम प्रकट केला होता. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र भाववाढीला तीव्र विरोध केला होता. ‘सुखाचे दिवस येणार’ असल्याची स्वप्ने दाखवत सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या विरोधातील हा असंतोष आणि आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुका यांचा दुहेरी विचार करून अखेर मोदी सरकार नरमले आणि त्यांनी मंगळवारी संध्याकाळी ही वारेमाप दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र ही दरवाढ पूर्णपणे मागे न घेता १४.२ टक्क्यांची वाढ सरकारने कायम ठेवली आहे. या दरांमध्ये काही करांचाही समावेश होणार असल्याने ही रक्कम काही प्रमाणात वाढणार असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
या वाढीमुळे सध्या ८५ रुपये असलेला द्वितीय दर्जाचा पास ९७ रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यात अधिक घटकांचा समावेश होणार असल्याने तो १०० ते ११० रुपयांपर्यंत वाढेल. ही दरवाढ २८ जूनपासून म्हणजे २७ जूनच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. दरम्यान, भाववाढ जोवर पूर्ण मागे घेतली जात नाही तोवर काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहील, असे मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आले.    

दरवाढ कशी?
द्वितीय दर्जा मासिक पास        १४.२ टक्के
प्रथम दर्जा मासिक पास          १४.२ टक्के
द्वितीय दर्जा साधारण तिकीट   ८० किलोमीटपर्यंत नाही.  त्यापुढे १४.२ टक्के
प्रथम दर्जा साधारण तिकीट     १४.२ टक्के