मरीन लाईन्स पोलीस ठाण्यातील शिपायाकडे अमली पदार्थाचा साठा आढळल्याच्या घटनेमुळे पोलीस दल पुरते हादरले असून अशा प्रकारच्या पोलिसांतील ‘गुन्हे’गारांवर पाळत ठेवण्याचे आदेश संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी दिले आहेत. अशा ‘गुन्हे’गार पोलिसांची एक गुप्त यादी तयार करण्यास सांगण्यात आले असून संबंधितांवर पाळत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. एखाद्या प्रकरणात असे ‘गुन्हे’गार पोलीस सापडण्याआधीच त्यांची कमी महत्त्वाच्या खात्यात बदली करण्यात येणार आहे.
पोलीस शिपाई धर्मराज काळोखे याच्याकडे सापडलेल्या अमली पदार्थाचे प्रकरण ताजे असतानाच ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांनी आर्थिक गुन्ह्य़ातील आरोपीला बारची सैर घडविल्याची घटना घडल्यामुळे मारीया संतापले आहेत. त्यांनी अशा ‘गुन्हे’गारांवर पाळत ठेवावीच लागेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बजावले आहे. अरुप पटनाईक हे पोलीस आयुक्त असताना पोलीस ठाण्यातील कामचुकार अधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले होते.  गेल्या काही महिन्यांत पोलिसांच्या हलगर्जीपणाच्या तसेच कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसविण्याच्या काही घटनांची नोंद झाल्यामुळे मारीया यांनीही पोलिसांची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. कामचुकार अधिकाऱ्यांसोबतच पोलिसांची अशा ‘गुन्हे’गारांना शोधून काढण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यापुढे कोणत्याही परिस्थितीत ‘गुन्हे’गार पोलिसांना थारा मिळू नये अशा रीतीनेच कारवाई केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

काळोखेसारख्या पोलीस ठाण्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती शोधून काढण्यास वरिष्ठ निरीक्षकांना सांगण्यात आले आहे. विशेषत: मिल प्रेशर, गुंड स्टाफ आदींबाबत माहिती घेण्यास सांगण्यात आले आहे. तसे आढळल्यास त्यांना बदलण्याचे आदेश देण्यात आले आहे. अशा पोलिसांतील गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सांगितले आहे.
– राकेश मारीया, पोलीस आयुक्त