माहीम येथे शनिवारी गुन्हे शाखेने सॅनिटायझरचा अवैध साठा हस्तगत केला. येथील मासळी बाजाराजवळ एका वाडीत सॅनिटायझरचा अवैध साठा करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या चेंबूर कक्षाला मिळाली होती. त्यानुसार छापा घालून १०० मिलीच्या पाच हजार बाटल्यांचा साठा हस्तगत केला.

हा साठा किरकोळ बाजारात चढय़ा भावाने विकला जाणार होता, अशी माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने विराज धारिया, जैनम डेढीया आणि नीरज व्यास या तिघांना अटक केली आहे. आरोपींनी जुहू येथील एका औषध विक्री दुकानाचे नाव वापरून संबंधित कंपनीच्या वितरकाकडून हा साठा मिळवला होता. शंभर मिली सॅनिटायझरसाठी ५० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. सॅनिटायझरचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात आला असून त्याची विक्री ठरलेल्या दरानुसार होणे अपेक्षित आहे. मात्र आरोपी पंधरा ते वीस रुपये वाढवून सॅनिटायझरचा साठा विकणार होते. या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

दुकानदारावर गुन्हा

मास्क व सॅनिटायझरची चढय़ा किमतींना विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदवण्यास सुरुवात केली आहे. ५० रुपयांना १०० मिली सॅनिटायझर असा दर निश्चित करण्यात आल्यानंतरही बोरिवली येथील एका औषध दुकानात दोनशे मिली सॅनिटायझरची विक्री ६३० रुपयांना सुरू होती. पोलिसांनी या दुकानाच्या मालकाविरोधात भारतीय दंड संहितेतील १८८ या कलमान्वये गुन्हा नोंदवला.