बाजारपेठेतील मागणीनुसार पदवीधर उपलब्ध होत नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष ब्रिटिश कौन्सिलने केलेल्या पाहणीत समोर आला आहे. भारतात विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, पण नोकरीस उपयुक्त अशा पदवीधरांची संख्या कमी असल्याचे त्यात म्हटले आहे.
ब्रिटिश कौन्सिलने मुंबईत ‘हायर एज्युकेशन अँड एम्प्लॉयबिलिटी : अ न्यू पॅराडीम, अ न्यू चॅलेंज’ या विषयावर चौथ्या ग्लोबल शिक्षण चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यावेळी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. भारतामध्ये बीपीओसारख्या जलदगतीने वाढणाऱ्या उद्योगात पदवीधरांसाठी रोजगारक्षमता केवळ ३८.२ टक्के इतकीच आहे. म्हणजे येथील पदवीधर हे थेट बीपीओत जाऊन काम करण्यास तयार नसतात. त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. यावरून देशात नोकरीला आवश्यक असे प्रशिक्षण दिले जात नाही. यामुळे बेरोजगारीचा टक्का वाढता राहिला आहे, असे स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे.