उदय सामंत यांची घोषणा; कुलगुरूंना परीक्षा पद्धत ठरवण्याचे अधिकार

पदवी-पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून, ऑक्टोबरअखेरीस निकाल जाहीर करण्यात येतील. परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात याबाबत कुलगुरू घेतील तो निर्णय स्वीकारण्यात येईल, असे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी आजी-माजी कुलगुरूंची समिती नेमण्यात आली आहे. या समितीबरोबर सामंत यांनी सोमवारी बैठक घेतली. ‘राज्यात अंतिम वर्षांचे साधारण ७ लाख ६२ हजार विद्यार्थी आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षा घेऊन ऑक्टोबरअखेरीस निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या विद्यापीठांना ३१ ऑक्टोबपर्यंत निकाल जाहीर करता येणार नाही, त्यांना १० नोव्हेंबपर्यंत मुदत देण्यात येईल. पूर्ण सप्टेंबर महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळू शकेल. ही परीक्षा कमी गुणांची असावी तसेच शक्यतो कोणत्याही विद्यार्थ्यांला परीक्षा केंद्रापर्यंत यावे लागू नये, त्यासाठी ऑनलाइन परीक्षा, प्रश्नपत्रिका घरी देणे अशा पर्यायांचा विचार करावा. सर्व परीक्षांसाठी शक्यतो एकच पर्याय असावा, अशा सूचना कुलगुरूंना देण्यात आल्या आहेत. परीक्षा कशी घ्यावी, याबाबत कुलगुरूंनी घेतलेला निर्णय मान्य करण्यात येईल,’ असे सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता विधि व न्याय विभाग आणि महाधिवक्ता यांच्याशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्यात येईल, असे सामंत यांनी संगितले.

अंतिम घोषणा बुधवारी

प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या कक्षेतील विभागाचा आढावा घेऊन परीक्षा कशा घ्यायच्या याचा अहवाल समितीला द्यायचा आहे. त्यासाठी समितीच्या अंतिम अहवालास मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रत्येक कुलगुरूंनी दिलेल्या आराखडय़ावर बुधवारी (२ सप्टेंबर) सकाळी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर परीक्षा पद्धत, वेळापत्रक असे तपशील जाहीर करण्यात येईल.

नवे शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून

सद्यस्थिती पाहता नवे शैक्षणिक वर्ष लगेच सुरू करणे शक्य नाही. ते जानेवारीपर्यंत सुरू होईल, असे दिसत नाही. मात्र, शक्य झाल्यास त्यापूर्वी शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे सामंत यांनी सांगितले.