प्रसाद रावकर

जेवणाच्या चवीबाबत येत असलेल्या तक्रारी, नगरसेवकांकडून वाढणारी मागणी आदी कारणांमुळे मुंबईत दोन वेळ वितरित करण्यात येणारे जेवण बंद करण्याचा विचार पालिका प्रशासन करते आहे. त्याऐवजी धान्यपुरवठा करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मुंबईतील जेवणपुरवठा बंद करण्यात येईल.

मुंबईमधील बेघर, बेरोजगार कामगार आदींना दोन वेळचे जेवण देण्याची व्यवस्था पालिकेने केली आहे. काही कंत्राटदारांना जेवणाचा पुरवठा करण्याचे कंत्राट पालिकेने दिले. जेवणाच्या वितरणाची जबाबदारी करनिर्धारण व संकलन विभाग आणि नियोजन खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. नगरसेवकांच्या मागणीवरून प्रत्येकाला ५०० जेवणाची पाकिटे देण्यात येत आहेत. मात्र काही नगरसेवक जेवणाची अतिरिक्त पाकिटे घेत आहेत.

मात्र तरीही तक्रारी येतच असल्याने आता जेवणाचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय प्रशासन पातळीवर घेण्यात आला आहे. पालिकेच्या एका विभाग कार्यालयाच्या हद्दीत प्रायोगिक तत्त्वावर जेवणाचा पुरवठा बंद करून तेथील केवळ बेघर, नोंदणीकृत बेरोजगार कामगार आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना धान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

४० हजार जणांना पुरवठा.. पालिकादरबारी बेघरांची नोंद आहे. तसेच १८ हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार हजार ४९० महिला आहेत. असे असताना आजघडीला वितरणासाठी दोन्ही वेळच्या जेवणाची एकूण मागणी सात लाख पाकिटांवर पोहोचली आहे. या सर्व मिळून ४० हजार जणांनाच जेवणाऐवजी धान्यपुरवठा केला जाईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.