पहिल्या टप्प्यात झालेल्या ३१३१ थेट सरपंच आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा आम्हालाच मिळाल्याचा दावा भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही केला आहे. निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्याने सारेच पक्ष आपल्याच पक्षाला जास्त जागा मिळाल्याचा दावा करीत आहेत.

विविध जिल्ह्य़ांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळाले आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपंचायतींपाठोपाठ ग्रामपंचायतींमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळाल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनीही या निवडणुकांमध्ये काँग्रेसलाच सर्वात चांगले यश मिळाल्याचा दावा करतानाच भाजपचा राज्यातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे सांगितले. नगराध्यक्षांप्रमाणेच सरपंचपदाची पहिल्यांदाच थेट निवडणूक घेण्यात आली. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचेच सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा भाजपचा दावा आहे. दुसऱ्या टप्प्यातही काँग्रेसलाच सर्वाधिक जागा मिळतील, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी केला. जालना जिल्ह्य़ातील २७२ पैकी १६३, बीडमध्ये ३५६ पैकी २०३, औरंगाबाद ९० पैकी ७२, नगर ११६ पैकी ७१, लातूरमध्ये २५० पैकी १५१ सरपंच भाजपचे निवडून आल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.