25 February 2021

News Flash

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर

१४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान

(संग्रहित छायाचित्र)

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणूक पार पडल्यावर सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला होणार आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षविरहित लढविल्या जात असल्याने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर होणाऱ्या थेट ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये कौल नक्की कोणाला, हे स्पष्ट होणार नाही.

महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका करोनामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणूक गेल्या आठवडय़ात पार पडली. यापाठोपाठ आता ३४ जिल्ह्य़ांमधील १४,२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला होतील, तर मतमोजणी १८ तारखेला होईल, असा निवडणूक कार्यक्रम राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी जाहीर केला. निवडणूक घोषणेबरोबर आचारसंहिता लागू करण्यात आली.

एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १, ५६६  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्चला मतदान होणार होते. परंतु करोनामुळे निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला. आता या पुढे ढकलण्यात आलेल्या या ग्रामपंचायतींसह डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या

ठाणे-१५८, पालघर-३, रायगड-८८, रत्नागिरी-४७९, सिंधुदुर्ग-७०, नाशिक-६२१, जळगाव-७८३, धुळे-२१८, नगर-७६७ , नंदुरबार-८७, पुणे-७४८, सोलापूर-६५८, सातारा-८७९, सांगली-१५२, कोल्हापूर-४३३, औरंगाबाद-६१८, उस्मानाबाद-४२८, नांदेड-१०१५, बीड-१२९, परभणी- ५६६, जालना-४७५, लातूर-४०८, हिंगोली-४९५, अमरावती-५५३, अकोला-२२५, यवतमाळ-९८०, वाशीम-१६३, बुलडाणा-५२७, नागपूर-१३०, वर्धा-५०, चंद्रपूर-६२९, भंडारा-१४८, गोंदिया-१८९ आणि गडचिरोली-३८२. एकूण-१४२३४.

निवडणूक कार्यक्रम असा..

* उमेदवारी अर्ज २३ ते ३० डिसेंबर २०२० पर्यंत. (सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.)

* उमेदवारी अर्जाची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी.

* उमेदवारी ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येईल.

* निवडणूक चिन्ह वितरण ४ जानेवारीला.

पक्षाच्या चिन्हाशिवाय..

ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हाशिवाय लढविल्या जातात. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या पहिल्याच थेट निवडणुकीत ग्रामीण भागाचा कौल कोणाला, हे स्पष्ट  होऊ शकणार नाही. एरवी निकालानंतर आम्हीच जास्त जागा किंवा ग्रामपंचायती जिंकल्या, असा दावा राजकीय पक्षांकडून के ला जातो.

मतदान, मतमोजणी :  मतदान १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. फक्त गडचिरोली जिल्ह्य़ात मतदानाची सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतमोजणी १८ जानेवारी रोजी होईल. दरम्यान, अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, असे मदान यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 12:03 am

Web Title: gram panchayat elections announced abn 97
Next Stories
1 शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वस्त्रसंहिता; जीन्स-टी शर्टवर बंदी, भडक कपडय़ांनाही नकार
2 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ७२०८ कोटींची वीजदेयके थकीत
3 शासकीय जमीन रूपांतरणास स्थगिती!
Just Now!
X