महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर ग्रामीण भागातील पहिल्याच मोठय़ा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी के ला. भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपापल्या प्रभाव क्षेत्रांमध्ये वर्चस्व कायम राखले असले तरी भाजपशी संबंधित आघाडय़ांना राज्याच्या सर्व भागांमध्ये बऱ्यापैकी यश मिळाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मूळ गावातील निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीला बरोबर घेतले होते. पण त्यांच्या गावात शिवसेनेचा भगवा फडकला. याबरोबरच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रभाव क्षेत्रात भाजपला फटका बसला. या निकालानंतर लगेचच सर्वत्र सरपंचपदांच्या निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू झाली.

राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. परिणामी सर्वच राजकीय पक्षांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला जातो व या वेळीही तसाच दावा सर्वपक्षीयांनी केला. १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा भाजप व महाविकास आघाडीकडून करण्यात आला.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपाठोपाठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही यश मिळाविल्याचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मंत्रिमंडळातील बहुतांशी सदस्य व विविध नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांतील किंवा बालेकिल्ल्यातील ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

विदर्भात काँग्रेस व भाजप या दोघांनाही यश मिळाले. मराठवाडय़ात महाविकास आघाडीचा वरचष्मा राहिला. कोकणात रत्नागिरीमध्ये शिवसेना तर सिंधुदुर्गमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा प्रभाव पाहायला मिळाला. उत्तर महाराष्ट्रात राजकीय पक्षांना संमिश्र यश मिळाले.

या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजप किंवा भाजपशी संबंधित आघाडय़ांना मिळाल्या असून, महाविकास आघाडी सरकारवर राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास नाही हेच यातून सिद्ध झाल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सरपंचपदांसाठी जुळवाजुळव

* नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडला जाईल. सरपंचपदाचे आरक्षणही अद्याप जाहीर झालेले नाही. यामुळे प्रत्येकाने सरपंचपद मिळविण्याच्या उद्देशाने ताकद लावली होती.

* निकालानंतर सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल. ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होताच सर्वच नेतेमंडळींनी सरपंचपद आपल्या गटाला मिळावे म्हणून जुळवाजुळव सुरू केली. विशेषत: बहुमत नसलेल्या ग्रामपंचायतींमध्ये नव्या सदस्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

* महाविकास आघाडी सर्वाधिक सरपंचपदांची निवडणूक जिंकेल, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला तरी स्थानिक पातळीवर आघाडी साधणे कठीण आहे.

हिवरे बाजारमध्ये पोपट पवार यांचा विजय

नगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, माजी मंत्री तथा भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे या प्रस्थापितांनी आपापल्या अधिपत्याखालील गड राखले. भाजपचे माजीमंत्री राम शिंदे यांना त्यांच्या चोंडी गावातच बसलेला धक्का. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये वर्चक निर्माण केले. बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होऊन ३५ वर्षांनंतर आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये प्रथमच झालेल्या निवडणुकीत पद्मश्री पोपटराव पवार यांनी राखलेली सत्ता, असे संमिश्र वातावरण नगर जिल्ह्यातील निकालाचे आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्येही अण्णांना मानणारे कार्यकर्ते विजयी झाले.

खडसे गटाला काठावर यश

जळगावात एकनाथ खडसे यांचा गड मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगरच्या कोथळी ग्रामपंचायतीत त्यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी आपल्या गटाची सरशी झाल्याचा तर, खडसे गटाने आपले सहा सदस्य निवडून आल्याचा दावा के ला आहे. जामनेरमधये भाजप आमदार गिरीश महाजन यांचे वर्चस्व राहिले. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात  विजयी आणि पराभूत दोन्ही गट आपलेच असल्याचा दावा त्यांनी केला.

विदर्भात नेत्यांचे वर्चस्व अबाधित

नागपूर: विदर्भात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विदर्भातील मंत्र्यांसह भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनीही  त्यांच्या गावात प्रभाव कायम ठेवल्याचे चित्र निकालातून पुढे आले आहे.नागपूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाने काटोल मतदारसंघातील काटोल तालुक्यातील तीन व नरखेड तालुक्यातील १७ पैकी १६ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला.

कोल्हापूर : भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र असतानाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गाव असलेल्या खानापूर या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने भगवा फडकवला आहे.   भुदरगड तालुक्यातील खानापूर या मुळ गावी आपली ताकद दिसावी यासाठी चंद्रकांत पाटील सुरुवातीपासून प्रयत्नशील होते.  या गावातील नऊ पैकी सहा जागा शिवसेनेने जिंकल्या. दोन जागा राष्ट्रवादीला तर एक जागा काँग्रेसला मिळाली.

राज्यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतींत काँग्रेस पक्षाला विजय मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे, मात्र त्या पक्षाचे नेते खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत.

– बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

निवडणुकीत शिवसेनेसह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची कामगिरी चांगली झाली आहे. ग्रामीण भागातील जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या कामावर पसंतीचा कौल दिला आहे. त्यामुळे पुढे काय होईल हे लक्षात घ्यावे.

अनिल परब, शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपला सहा हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींत बहुमत मिळेल. जनतेच्या मनात असलेला राग या निवडणुकीतून व्यक्त झाला.

-चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

महाविकास आघाडी एकत्र असतानाही भाजप हाच ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणात भाजपने यश मिळवले आहे.

-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मराठवाडय़ात महाविकास आघाडीचा वरचष्मा

औरंगाबाद : मराठवाडय़ातील चार हजार १३४ ग्रामपंचायतीं मध्ये   महाआघाडीचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. भाजपचा प्रभाव असणाऱ्या भोकरदन मतदारसंघात काही ठिकाणी पक्षाचा पराभव झाला. औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व राहिले. तर लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजपने अधिक ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा केला आहे.  अमित देशमुख, अब्दुल सत्तार यांनीही मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वर्चस्व राखले. आदर्श गाव अशी राज्यात ओळख निर्माण करणारे पाटोदा गावातील भास्कर पेरे यांनी त्यांच्या मुलीस मैदानात उतरविले होते पण त्यांचा पराभव झाला.  जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतीपैकी बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व त्यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे यांच्या मतदारसंघातील  रेणुकाई पिंपळगाव, पारध, सिपोरा बाजार, वालसावंगी या ग्रामपंचायतीत भाजपचा पराभव झाला.

जळगावमध्ये तृतीयपंथी उमेदवार विजयी

जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीयपंथी उमेदवार अंजली जान या विजयी झाल्या. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी अर्जात ‘लिंग’ प्रकारापुढे ‘इतर’ असे नमूद करत महिला राखीव गटात अर्ज भरला होता. निवडणूक यंत्रणेने अर्ज नाकारल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाकडून त्यांना महिला वर्गवारीत अर्ज भरण्याची परवानगी मिळाली. यानंतर त्यांनी अतिशय जोमाने प्रचार केला. मतमोजणीत त्या विजयी झाल्या.  दरम्यान उत्तर महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायतीत प्रस्थापित गटांना हादरे देत मतदारांनी परिवर्तन घडविले.