वरळी-कोळीवाडा येथील पाच एकर जागेची चाचपणी;  शिवसेनेला खूश करण्याचा प्रयत्न

मधु कांबळे, मुंबई : राज्य सरकारच्या वतीने दादर येथील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र त्याशिवाय मुंबईत ठाकरे यांच्या नावाने स्मारकाच्या स्वरूपात आणखी एक भव्य संकुल उभारण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता वरळी-कोळीवाडा येथील पाच एकर जमीन मिळविण्याबाबत चाचपणी सुरू आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला खूश करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असू शकतो असे मानले जात आहे.

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
BJP Workers, Protest Burn Effigy, Outside Vilas Muttemwar s Residence, During Code of Conduct, Muttemwar register complaint, election commission, nagpur code of conduct violation, nagpur news, bjp nagpur,
माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नागपूर येथे रविवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना गडकरी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त केली आणि त्यांच्या नावाने मुंबईत एक भव्य असे संकुल (कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्याची इच्छाही बोलून दाखविली.

गेल्या आठवडय़ात दिल्लीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गडकरी यांची भेट घेतली. त्या भेटीत आपण बाळासाहेबांच्या नावाने मुंबईत संकुल उभारण्याची कल्पना त्यांना सांगितल्याचे गडकरी म्हणाले.

राज्यातील मेट्रो, रस्ते, जलवाहतूक, विमानसेवा, सिंचन, शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षणासाठी विविध समाजघटकांकडून सुरू असलेली आंदोलने याबाबत नितीन गडकरी यांनी आपली परखड मते मांडली.

राज्यातील रखडलेले पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला मोठा निधी दिल्याची माहिती त्यांनी दिली. भारतीय राज्य घटनेने सामाजिकदृष्टय़ा मागासलेल्या वर्गाला दिलेले आरक्षण कायम राहिले पाहिजे, परंतु सर्वच समाजात गरीब वर्ग आहे, त्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतीला पाण्याची व्यवस्था झाली, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले, तो समृद्ध झाला तर, आरक्षणाची गरजच भासणार नाही, असे मतही त्यांनी नोंदविले.

राज्यकर्त्यांची इच्छा असेल आणि योग्य नियोजन असेल तर विकासकामात पैसा किंवा निधी ही अडचण राहत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.

बाळासाहेब ठाकरे यांची हा मार्ग व्हावा अशी इच्छा होती. बाळासाहेबांचे आणि आपले अतिशय उत्तम संबंध होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर आहे. राज्यात युतीचे सरकार असताना आपण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग प्रकल्प हाती घेऊन ठाकरे यांची इच्छा पूर्ण केली. आता त्यांच्या नावाने मुंबईत एक वास्तू बांधण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेची वरळी-कोळीवाडा येथे तीन एकर जागा आहे. त्याला लागून मुंबई पोर्ट ट्रस्टची दोन एकर जागा आहे. महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. त्यांचे पुनर्वसन करून, ती जागा मोकळी करून घ्यावी लागणार आहे. पोर्ट ट्रस्टच्या जागेवर कामगारांच्या वसाहती आहेत. तसेच मोकळे मैदान आहे. कामगार-कर्मचाऱ्यांची अन्यत्र व्यवस्था करावी लागेल. या दोन्ही जागा मिळाल्या तर, त्या ठिकाणी महापौर बंगल्याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मारकाच्या स्वरूपात आणखी एक वास्तू उभारता येईल, अशी इच्छा गडकरी यांनी बोलून दाखविली.