मेट्रो व सिडकोचे सहकार्य; जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापासून कार्यान्वित

मुंबई : बीकेसी, गोरेगाव नेस्को याप्रमाणेच आता दहिसर व मुलुंड या मुंबईच्या सीमा भागांतही रुग्णालये बांधण्यात येत आहेत. या ठिकाणी ‘जम्बो फॅसिलिटी’ अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे उभारण्यात येणार आहेत. दहिसर पूर्व व पश्चिम येथे १,०६५ खाटांचे तर मुलुंड येथे १,९१५ खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. ही उपचार केंद्रे जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापासून  कार्यान्वित होणार आहेत.

टाळेबंदी शिथिल केल्यानंतर पुढील काळात रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर तात्पुरत्या रुग्णालयांची बांधणी करण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे.

‘कोविड १९’ बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी अधिक क्षमतेची उपचार केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्याच धर्तीवर ‘मुंबई मेट्रो’च्या पुढाकाराने दहिसरमध्ये तर मुलुंडमध्ये सिडकोच्या मदतीने रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येत असलेल्या या तिन्ही उपचार केंद्रांची मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, उपायुक्त विजय बालमवार, संबंधित साहाय्यक आयुक्त तसेच ‘मुंबई मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल व ‘सिडको’चे अश्विन मुद्गल उपस्थित होते. ही तिन्ही उपचार केंद्रे येत्या पावसाळ्यातील कमाल पर्जन्यमानाचा अंदाज बांधून तयार केली जात आहेत.

तिन्ही ठिकाणी खाटांना प्राणवायू

* दहिसर पूर्व ९५५ खाटांचे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. या ठिकाणी असणाऱ्या ९५५ खाटांपैकी ६४० खाटांना प्राणवायू सुविधा उपलब्ध असेल.

* दहिसर पश्चिमेला कांदरपाडा परिसरात प्रस्तावित असणाऱ्या ११० खाटांपैकी ७७ खाटा ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ असतील. तर ३३ खाटा अतिदक्षता कक्षाचा भाग असतील. उर्वरित १० करोनाबाधित रुग्णांच्या डायलिसिसकरिता असतील.

* मुलुंड परिसरातील लालबहादूर शास्त्री मार्गालगत १,९१५ खाटांचे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. एकूण खाटांपैकी ५० खाटा अतिदक्षता कक्ष असतील. त्यानंतर त्या ठिकाणची गरज लक्षात घेऊन अतिदक्षता कक्षाची क्षमता वाढविली जाईल. उर्वरित १,८६५ खाटांपैकी किमान १ हजार खाटांना प्राणवायू सुविधा असेल, अशी माहिती उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली आहे.