२०१४च्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षासाठी मत न देता देशासाठी मत द्या, असे आवाहन करत  नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘व्होट फॉर इंडिया’चा नारा दिला. तर लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावून लोकांनीही या सभेला महाप्रतिसाद दिला. या सभेला झालेल्या गर्दीने मोदींचाही आत्मविश्वास उंचावला व ‘देशातील जनतेच्या हृदयात आपण स्थान मिळविल्याचा’ दावा करीत त्यांनी त्याचे स्पष्ट संकेतही दिले.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभांचे आयोजन देशात सर्वत्र केले जात असून, त्याचाच भाग म्हणून मोदी यांची प्रचंड मोठी सभा वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आली होती. मोदी यांच्या ‘महागर्जनेला’ लाखो कंठांमधून प्रतिसाद मिळाला आणि परिसर मोदींच्या घोषणांनी दुमदुमून गेला. सुमारे तासभर केलेल्या भाषणात मोदी यांनी विविध विषयांचा ऊहापोह करीत काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला आणि भाजपला निवडून देण्याची वेळ आल्याचे आवाहन केले. भ्रष्टाचार, महागाई आदी सर्व समस्यांचे मूळ असलेल्या काँग्रेसला उखडून फेकून देण्यासाठी आगामी निवडणुकीत केवळ पक्षासाठी नाही, तर देशासाठी मतदान करावे, असे आवाहन करीत ‘व्होट फॉर इंडिया’चा नारा दिला. देश वाचविण्यासाठी भाजपलाच का साथ द्यावी, याबाबत मोदी यांनी ‘व्होट फॉर इंडिया’या नारेबाजीला हजारो कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला.
गेल्या दहा वर्षांत काँग्रेसने देशाचे पार वाटोळे केले. भ्रष्टाचार कमालीचा वाढला तरीही या पक्षाचे एक नेते भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे, असे मत मांडतात हे बघूनच आश्चर्य वाटते, असे सांगत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टोला हाणला. ‘आदर्श’चा अहवाल फेटाळल्याच्या मुद्दय़ाचा उल्लेख करीत मोदी यांनी, भ्रष्टाचारात बुडालेल्या पक्षाचे नेते नवी दिल्लीत भ्रष्टाचारमुक्तीचे डोस देत होते, त्याच वेळी महाराष्ट्रात ‘आदर्श’मधील भ्रष्टाचारी मंत्र्यांना वाचविण्यासाठी धडपड करीत होते. काँग्रेसची उक्ती आणि कृतीमध्ये फरक आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून मिळविलेला काळा पैसा स्विस बँकेसह परदेशांमधील बँकांमध्ये ठेवण्यात आला आहे. िहमत असेल तर कायदा करून तो पुढील तीन वर्षांत परत आणून दाखवावा, असे आव्हान मोदी यांनी दिले.
दृष्टिकोनात मूलभूत फरक
काँग्रेस आणि भाजपच्या दृष्टिकोनात मूलभूत फरक असल्याचे दाखवून देत मोदी यांनी विक्रांत युद्धनौकेबाबतच्या वादाचा उल्लेख केला. ऐतिहासिक महत्त्व असलेली आणि सैन्यदलाचा मानदंड असलेली युद्धनौका भंगारात काढून तिचे तुकडे करण्याची काँग्रेसचे केंद्र व राज्य सरकारची भूमिका आहे. तर आम्ही प्रत्येक गावातून लोखंडाचे तुकडे जमा करून ‘एकतेचे प्रतीक’ असलेले सरदार पटेल यांचे अतिभव्य स्मारक साकारत आहोत. ऐतिहासिक वारसा जतन करणार आहोत.  मुंबईसारख्या शहरात भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षांत फारसे काही केले गेले नाही. चित्रपट, इतिहास, संशोधन, तंत्रज्ञान अशा विविध विषयांसाठी विशेष विद्यापीठ का स्थापन केले जात नाही, असा सवाल मोदी यांनी केला.
मोदी उवाच
*महाराष्ट्रातील एलबीटी कर म्हणजे ‘लूट- बाँट- टेक्निक’!
*कुप्रशासन म्हणजे मधुमेहाप्रमाणे सर्व शरीर पोखरते!
*लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या मंत्राप्रमाणे आता सुराज्याच्या मंत्राचा गजर हवा!
*व्यासपीठाभोवती आयबी, एनएसजी, पोलिस व सुरक्षा पथकाचे अनेक पदरी कडे
*निवडणूक खर्चासाठी पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांना २५ कोटी रुपयांचा निधी सुपूर्द
*ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशियासह विविध देशांच्या दूतावास व उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची सभेला हजेरी
ओबामा ते मोदी
चहा विकणारा देशाचा पंतप्रधान कसा होणार, अशी टीका काँग्रेसने केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हजारो चहावाल्यांना या सभेसाठी ‘व्हीआयपी’ पास देण्यात आले. आम्हाला चहावालाच नाही, प्रत्येक गोरगरीब हा ‘व्हीआयपी’ आहे, असे सांगत मोदी यांनी आपल्यावरील टीकेचा समाचार घेतला. ‘पूर्वाश्रमी आईस्क्रीम विकणारे बराक ओबामा आणि लाकूड तोडणारे अब्राहम िलकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. पेपर विकणारे डॉ. अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती झाले’, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
‘नमो गर्जनेसाठी’ ‘बेस्ट’च्या २५० जादा गाडय़ा
वांद्रे-कुर्ला संकुलात रविवारी झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ‘बेस्ट’ने दिवसभरात २५० जादा गाडय़ा सोडल्याची माहिती ‘बेस्ट’चे उप जनसंपर्क अधिकारी मनोज वऱ्हाडे यांनी दिली. या गाडय़ा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, खोदादाद सर्कल, वांद्रे पूर्व, आणि ठाणे येथून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे सोडण्यात आल्या.

“येत्या लोकसभा निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेसने भाजपशी गुप्त युती आह़े  पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांची उमेदवारी मान्य करून ते भाजपसोबतच निवडणुका लढणार आहेत़  हे मोठे आव्हान आह़े  मोठा धोका आह़े  परंतु, आम्ही भाजपला तृणमूलचा हात धरून पश्चिम बंगालमध्ये स्थिरावू देणार नाही़,”
बुद्धदेव भट्टाचार्य, मार्क्‍सवादी पक्षाचे नेते

“नरेंद्र मोदी यांचे विचार भारतीय लोकशाहीसाठी धोकादायक आहेत. राजस्थान निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी राज्यभर उग्र जातीयवाद पसरवला. त्याचमुळे काँग्रेसचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. मोदींच्या ‘गोबेल्स नीती’मुळेच या राज्यात भाजपला सत्ता स्थापन करता आली.”
अशोक गेहलोत , राजस्थानचे माजी मुख्यमंत्री.