News Flash

वृद्धाने नातवाला सहाव्या मजल्यावरून फेकले

घरात मालमत्तेच्या वादावरून सततच्या कुरबुरींना त्रासलेले असताना त्याचा राग नातवावर निघाला.

झोपू देत नसल्यामुळे टोकाचे पाऊल, वाकोला येथील भीषण घटना

साडेतीन वर्षांचा नातू झोपू देत नसल्याने चिडलेल्या ८० वर्षीय आजोबांनी त्याला थेट सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना वाकोला येथे उघडकीस आली आहे. वाकोला पोलिसांनी आजोबांना अटक केली असून नातवाला फेकण्याआधी त्यांचे सुनेसोबत भांडण झाल्याची माहिती उघड होत आहे. घरात मालमत्तेच्या वादावरून सततच्या कुरबुरींना त्रासलेले असताना त्याचा राग नातवावर निघाला.

वाकोल्यातील खांडवाला इमारतीमध्ये निवृत्ती खर्चे (८०) आपला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसोबत राहतात. खर्चे यांचा मुलगा रुपेश बेरोजगार असून सून सुरेखा धुणीभांडी करून घर चालवते. मात्र, खर्चे यांच्या नावावर असलेल्या इमारतीच्या घरावरून त्यांच्यात सतत भांडणे होत असत. तर, वेळेवर जेवण न मिळणे, खर्चाला पैसे न मिळणे या कारणांवरून निवृत्ती खर्चे त्रासलेले होते. रविवारी रात्रीही खर्चे यांचे घरात भांडण झाले. त्यानंतर, रात्री झोपण्याचा प्रयत्न करीत असलेल्या खर्चे यांच्याशी साडेतीन वर्षांचा मयूरेश खेळण्याचा प्रयत्न करीत होता. झोपलेल्या खर्चे यांच्या अंगावरील अंथरूण खेचून सतत हसत होता. तेव्हा, मला झोपू दे नाही तर इमारतीवरून फेकून देईन, असे खर्चे यांनी नातवाला दरडावले. पण, याचीही चिमुकल्या मयूरेशला मौज वाटली. तो आजोबांशी खेळतच राहिला. अखेर चिडलेल्या निवृत्ती यांनी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मयूरेशला इमारतीच्या चार फुटांच्या ग्रीलवरून फेकून दिले आणि शांतपणे घरात येऊन बसले.

काही वेळानंतर इमारतीतील काही रहिवाशांनी मयूरेश रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे पाहिले. ते धावत खर्चे यांच्या घरी आले. त्यांनी मयूरेश पडून जखमी झाल्याचे सांगितल्यावर त्याला तातडीने व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दाखल करताक्षणीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 1:30 am

Web Title: grandfather threw boy from sixth floor
Next Stories
1 लेप्टो रोखण्यासाठी तबेल्यांच्या मालकांना पालिकेची नोटीस
2 मान्सूनपूर्वी बेस्ट वीज कर्मचाऱ्यांची ‘पॉवर’ कमी!
3 एकनाथ खडसेंची कॅबिनेट बैठकीला दांडी; लाल दिव्याची गाडीही नाकारली
Just Now!
X