कांदिवलीतील डहाणूकर वाडी येथील बालक विहार विद्यालय या शाळेत बोगस शिक्षक दाखवून राज्य सरकारला वेतन अनुदानाच्या नावाखाली लाखो रूपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
डॉ. राममनोहर लोहिया शिक्षण संस्था चलित या मराठी शाळेने २०१३-१४ मधील रिक्त पदे व अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती सरकारला देताना हा गैरप्रकार केला. त्यात स्मिता पाटील, शितल शेंडगे, विजय गावडे आणि बबन शेख या सेवेत नसलेल्या व्यक्तींची बोगस नावे अतिरिक्त शिक्षक म्हणून कळवली. त्यापैकी गावडेंचे अन्य एका शाळेत समायोजन करण्याचा आदेशही सरकारने काढला असून या महाशयांचा ‘आयत्या शाळेतले शिक्षक’ होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
या शिवाय जे शिक्षक सेवेतच नाहीत त्यांच्या नावाने तब्बल १८ लाख ३२ हजार रुपये वेतन अनुदानापोटी शाळेने लाटले. शाळेने सेवेत नसलेल्या माधुरी मराठे , अशोक पाटील आणि संगीता प्रकाश पाटील या तीन बोगस शिक्षकांच्या नावे दरमहा प्रत्येकी ३३,८३० रुपये इतका पगार ऑनलाईन पध्दतीने काढला. याच शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून दाखवून त्यांच्या थकलेल्या वेतनापोटी १६ लाख रुपयेही सरकारकडून वसूल केले. शाळेतीलच शिक्षकांनी ही बाब माहितीच्या अधिकाराखाली उघड केली.
शाळेतून अतिरिक्त ठरणाऱ्या कायम सेवेतील शिक्षकांची नावे शिक्षण विभागाला कळवून त्यांचा नोव्हेंबर, २०१४चा पगारही ऑफलाईन पध्दतीने काढण्यात आला. प्रभारी मुख्याध्यापक प्रवीण कदम यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतीने हा गैरप्रकार केल्याचा आरोप शिक्षकांनी केला. तशी तक्रारच शालेय शिक्षण सचिव आणि संचालकांकडे केली आहे. खोटी माहिती देणे, आर्थिक फसवणूक व दिशाभूल करणे आणि सरकारच्या पैशाचा अपहार याबद्दल कदम व त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, या गोंधळाला आम्ही नव्हे, शिक्षणाधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप कदम यांनी केला. या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहीले असून त्यांच्या निदर्शनास हे आणून दिल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अल्पावधीत मी मुख्याध्यापक झाल्यामुळे या तक्रारी होत असल्याचेही ते म्हणाले.