मुंबई: निर्बंध काळात परवानाधारक रिक्षाचालकांचे बुडलेले उत्पन्न काही प्रमाणात भरून काढण्यासाठी त्यांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान जमा करण्याच्या निर्णयानुसार आजपर्यंत एकूण २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा परवानाधारकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. तर सुमारे ७१ हजार रिक्षाचालकांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.

रिक्षा चालकांसाठी एकूण १०८ कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी १,५०० रुपयांप्रमाणे सानुग्रह अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी परिवहन विभागामार्फत एक ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली असून २२ मे २०२१ पासून चालकांना अर्ज करण्यासाठी ती खुली करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षाचालकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यापैकी ७१ हजार ४० रिक्षाचालकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १ लाख ५ हजार रिक्षाचालकांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्याबाबत कळविण्यात आल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याकरिता परवानाधारक रिक्षाचालकाकडे आधार क्रमांक असणे आवश्यक असून, तो ज्या बँक खात्याशी जोडणी केलेला आहे त्या खात्यामध्ये रक्कम ऑनलाइन पद्दतीने जमा करण्यात येत आहे. परवानाधारकांना नवीन आधार क्रमांक काढण्याकरिता व मोबाइल क्रमांकाची आधार क्रमांकाशी जोडणी करण्याकरिता परिवहन कार्यालयांमध्येसुद्धा आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे.