किनाऱ्यावर आदळणाऱ्या उंचच उंच लाटांची मजा काही औरच.. वारा आणि मुसळधार पावसाचे इंधन मिळाले, की दर्याला तुफान येते आणि या फेसाळणाऱ्या लाटांमध्ये चिंब भिजण्याचा अनुभव लाखो मुंबईकर दर पावसाळ्यात घेतात. पण या भरतीच्याच पुढे-मागे असणारी ओहोटी अनेकांच्या खिजगणतीतही नसते. मात्र इतर वेळी पाण्याखाली असलेल्या काही किलोमीटर दूरवरच्या जमिनीचे दर्शन घडवणारी ओहोटी मंगळवारी लागली आणि ओहोटीही किती चित्तवेधक असू शकते, याचा अनुभव सायंकाळी समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या मुंबईकरांना मिळाला.
साडेचार मीटरहून अधिक उंची गाठणाऱ्या भरतीचे पाणी व लाटा मुंबईकरांना नव्या नाहीत. त्याला मुसळधार पावसाची साथ मिळाल्यास सखल भागात तुंबणाऱ्या पाण्यामुळे व विस्कळीत होणाऱ्या जनजीवनामुळे या भरतीचा धसकाही घेतला जातो. ओहोटीचा प्रभाव मासेमारी, जहाजांची वाहतूक यावर पडतो, मात्र हवामान तसेच रोजच्या जगण्यावर ओहोटी परिणाम करत नसल्याने ती दुर्लक्षित राहते.
साधारणपणे दर सहा तासांनी भरती व त्यानंतर ओहोटी असा क्रम असतो. म्हणजेच दरदिवशी प्रत्येक किनाऱ्यावर दोन वेळा भरती व दोन वेळा ओहोटी येते. चंद्रोदय व चंद्रास्त यांच्या वेळा, चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर, सूर्य-पृथ्वी-चंद्र यांचा एकमेकांशी कोन आणि पृथ्वीवरील ठिकाण अशा अनेक बाबींवर भरती व ओहोटीच्या वेळा व त्यांची उंची ठरते. भूविज्ञान मंत्रालय या उंचीबाबत अंदाज देते. मुंबईत साधारणपणे भरतीच्या वेळी पाण्याची उंची चार मीटपर्यंत वाढते, तर ओहोटीच्या वेळी सर्वसाधारणपणे पाण्याची उंची ९० सेंटीमीटपर्यंत खाली येते. मंगळवारी मात्र संध्याकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी पाणी आणखी खाली गेल्यामुळे आधीच उथळ असलेल्या किनाऱ्यावरील काही किलोमीटपर्यंतच्या जमिनीचे दर्शन घडले.
भरती व ओहोटी या भूविज्ञानातील सर्वसामान्य घटना आहेत. चंद्राचे अंतर व त्याचा सूर्य-पृथ्वीशी असलेला कोन यामुळे भरती-ओहोटीची उंची कमी-अधिक होत असते. मंगळवारी, संध्याकाळी ६.२५ वाजता सूर्यास्ताची वेळ होती. त्याचवेळी चंद्रही पश्चिमेला होता. चंद्रास्ताची वेळ ७.२६ वाजता होती. सूर्य व चंद्र एकाच दिशेने आल्याने पाणी पश्चिमेकडे खेचले गेले आणि ओहोटीचा प्रभाव वाढला. खगोलशास्त्रानुसार याचवेळी पूर्व आफ्रिकेमध्ये मात्र सर्वात मोठी भरती असेल, अशी माहिती नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली.