‘ग्रेट गोल्डन सर्कस’कडून शासकीय र्निबधांचे उल्लंघन

हत्तीणींच्या आरोग्याची हेळसांड केल्याबद्दल नवी मुंबईतील ‘ग्रेट गोल्डन सर्कस’ची प्राणी बाळगण्याची मान्यताच ‘केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने’ रद्द केली असून आता या सर्कसमध्ये प्राणी पाहणे दुरापास्त ठरणार आहे. डिसेंबर महिन्यात मान्यता रद्द झाल्यानंतरही या सर्कसचे कार्यक्रम नवी मुंबई परिसरात होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई वनविभागाकडून का करण्यात आली, हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

देशी-परदेशी कलाकारांच्या कसरती, विदूषकांच्या कोलांटय़ा उडय़ा, परदेशी नृत्यांगनांच्या दिलखेचक नृत्याबरोबरच वन्य प्राण्यांचे विविध खेळ सर्कशींचा आकर्षण बिंदू असतात. मात्र अनेक सर्कशीत या प्राण्यांची निगा नीट राखली जात नसल्याने वन्य जीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन होत आहे. सध्या नवी मुंबईत बस्तान असलेल्या ग्रेट गोल्डन सर्कशीबाबतही असाच प्रकार घडला आहे. या सर्कशीच्या व्यवस्थापनाने दोन हत्तीणींची योग्य देखभाल न केल्यामुळे त्या आजारी पडल्या होत्या. याची गंभीर दखल घेत गेल्या वर्षी जुलै महिन्यात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने एका समितीमार्फत हत्तीणींची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या तपासणीत हत्तीणींची निगा न राखल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने ७ डिसेंबर रोजी प्राणी

बाळगण्याची ग्रेट गोल्डन सर्कसची मान्यता रद्द केली. परंतु त्यानंतरही या सर्कशीत प्राण्यांचे खेळ सुरू असल्याचे उघड झाले आहे.

या सर्कशीचा तंबू सध्या खारघरमध्ये पडला आहे. ‘ग्रेट गोल्डन सर्कस’ची बाजू समजून घेण्याकरिता व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र रवीभाई नामक त्यांच्या प्रतिनिधीने प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली. ‘नवी मुंबईतील सर्कसचे खेळ सोमवारी संपले आहेत. मात्र याप्रकरणी आमचे व्यवस्थापक अधिक भाष्य करू शकतील,’ असे मोघम उत्तर त्यांनी दिले. तसेच, व्यवस्थापकांशी ई-मेलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

त्वरित कारवाई करा..

या सर्कशीतील हत्तीणींचे आरोग्यमान खालावले असल्यानेच आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यांना मान्यता रद्द करण्याचे पत्र पाठविण्यात आल्यानंतरही त्यांनी आपले खेळ चालू ठेवले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, असे तक्रारकर्ते व ‘पॉज’ संस्थेचे सुनिश कुंजू यांनी सांगितले.

सर्कस व्यवस्थापक केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या विरोधात न्यायालयात गेले असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. मात्र आम्हाला हत्तीणींच्या आरोग्याची काळजी आहे. त्यांच्या आरोग्याचे निरीक्षण करण्यासाठी आमच्यातर्फे एक वैद्यकीय समिती स्थापन केली असून त्यात आमच्या वन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ते या हत्तीणींवर नजर ठेवून आहेत व त्याबाबतची सगळी माहिती आम्ही मिळवीत आहोत.

– ए. बॅनर्जी, विभागीय वन अधिकारी, रायगड</strong>

हत्तीणींबाबत निष्काळजीपणा

सर्कशीतील हत्तीणींना जखडून ठेवण्यात आले असून त्यांच्या पायांना जखमा झाल्या आहेत. यातील चंपा हत्तीणीची तब्येत खराब झाली आहे. सर्कशीच्या व्यवस्थापनाने हत्तीणींवर आजवर केलेल्या उपचारांची माहिती ते केंद्रीय समितीला सादर करू शकले नाहीत. हत्तीणींना अनेक आजार व संसर्ग झाले आहेत, असे केंद्रीय समितीने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले होते.