मुंबई शहरात गेल्या तीन महिन्यांत कोविड-१९ आजारासंबंधीचा बायोमेडिकल कचरा १०४ टक्क्यांनी वाढला आहे. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या देवनार येथील एक एकर जागेतील युनिटची जागाही आता भरुन गेली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारे करोनाचे रुग्ण आणि त्यांच्यावर उपचारांसाठी वापरुन कचरा झालेलं वैद्यकीय साहित्य याचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

बृहन्मुंबई महापालिकेनं शहरातील सर्व कोविड-१९ चा कचरा उचलण्याचं कंत्राट SMS Envoclean Pvt Ltd. या कंपनीकडे दिलं आहे. या कंपनीचं म्हणणं आहे की, करोनाच्या रुग्णांवर उपचारानंतर निर्माण होणाऱ्या वैद्यकीय कचऱ्यामध्ये प्लास्टिक कचऱ्याचा सर्वाधिक समावेश आहे. यामध्ये सिरिंज, सलाईनच्या बाटल्या, मास्क, क्लोव्ह्ज, मुदत संपलेली औषधं, इतर उपकरणं, रिकाम्या अॅम्प्युल्स आदींचा समावेश असतो. सुमारे २००० किलो वैद्यकीय कचरा दररोज या कचऱ्याच्या प्लँटमध्ये प्रक्रियेसाठी आणला जातो.

त्यानंतर केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) नियमावलीनुसार, आरोग्य सुविधा केंद्रातील प्लास्टिकचा कचरा वेगळा करुन तो लाल रंगाच्या पिशव्यांमध्ये गोळा करायचा. त्यानंतर प्रत्येक पदार्थ निर्जंतुक करुन तो पुनर्निमितीसाठी वेगळा ठेवायचा. तथापी, सध्या कोणतीही रिसायकलिंग युनिट कार्यरत नसल्याने आणि वाहनांची संख्या कमी असल्याने आमच्याकडे कोणतीही अतिरिक्त कचरा साठवण्यासाठी जागा पूर्णपणे संपली आहे. असे एसएमएस एन्व्होक्लिनचे संचालक अमित निलावार यांनी सांगितले. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. कचर्‍याच्या वाढीमुळे प्रक्रिया केंद्रात लोकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. दरम्यान, जूनमध्ये करोना विषाणूची लागण होण्याच्या भीतीने २० स्वच्छता कामगारांनी कचरा प्रक्रिया केंद्र सोडले होते.

एसएमएस एन्व्होक्लिननुसार, कोविड -१९ आणि बायोमेडिकल कचर्‍याचे प्रमाण जूनमध्ये दररोज १२,२०० किलोग्रॅम होते त्यात वाढ होऊन ते ऑगस्टमध्ये दररोज सरासरी २,८८० किलोपर्यंत पोचले. मुंबईत १२,००० आरोग्य सुविधा केंद्रांमधून पिवळ्या रंगांच्या बॅगांमधून हा कचरा गोळा केला जातो.

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) ने एप्रिलमध्ये एक समिती नेमली असून या समितीने सर्व राज्यांना अतिरिक्त कोविड-१९चा कचरा गोळा करण्यासाठी कचरा प्रक्रिया सुविधांच्या विस्ताराकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व महापालिकांना आपापल्या सुविधांचे ऑडिट करण्यासही सांगितले होते.